मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारांबाबत केलेल्या एका विधानामुळे सत्ताधारी आक्रमक झाले. महापौरांनी माफीची मागणी लावून धरल्यामुळे सभागृह दोनदा तहकूब करावे लागले. विरोधक ही आपल्या वक्तव्यावर ठाम राहीले. किशोरी पेडणेकर यांनी माफी मागणार नाही असं स्पष्टकरत आपलण काय बोलले हे ही सांगितले. त्यात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. अखेर कामकाज ठप्प झाले.
सभागृहात महापौरांच्या सन्मानावरून चर्चा सुरू असताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी नवीन सदस्यांना शिस्तीचे डोस पाजले. त्याला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत.” या विधानानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. त्यात विरोधकांसोबत सत्ताधारी ही आघाडीवर होते. कोणती ही चर्चा त्यामुळे अर्थसंकल्पावर होवूच शकली नाही.
नक्की वाचा - Video: दोन विमानं समोरासमोर, पंख ही एकमेकांना घासले, दिल्ली विमानतळावरचा हादरवणारा थरार
गोंधळ वाढल्याने महापौर रितू तावडे यांनी 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र, कामकाज पुन्हा सुरू होताच वातावरण अधिकच तापले. गणेश खणकर यांनी थेट किशोरी पेडणेकर यांच्या निलंबनाची मागणी केली. दुसरीकडे, काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी निधी वाटपातील पक्षपाताचा मुद्दा उचलला, परंतु त्यांना बोलू न दिल्याने विरोधकही आक्रमक झाले. दोन्ही बाजून महापालिकेच्या सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. अशा स्थितीत कामकाज पुढे नेणे शक्य नव्हते.
वाढता वाद पाहून किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले की, "मी बाळासाहेब विकत घेतले असे म्हटले नाही, तर विचार विकत घेतले नाहीत असे म्हटले आहे. सत्ताधारी मूळ विषय भरकटवत आहेत." मात्र, त्यांनी थेट माफी मागण्यास नकार दिला. यावर महापौर रितू तावडे यांनी "बाळासाहेब सर्वांचे आहेत आणि माफीशिवाय सभागृह चालणार नाही," असा कडक पवित्रा घेतला.
निधी वाटपावरून सुरू झालेला वाद आता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाभोवतीच्या भावनिक संघर्षात रूपांतरित झाला आहे. यामुळे अर्थसंकल्पावरील महत्त्वाची चर्चा बाजूला पडून सभागृह राजकीय आखाडा बनले आहे. आता पेडणेकर माफी मागणार की त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या दिवशी मात्र बाळासाहेबांच्या 'संस्कारां'वरून महापालिकेत कलगीतुरा पाहायला निश्चितच मिळाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world