Mumbai News : मुंबईतील भांडुप येथील खिंडीपाडा येथील महापालिकेची मराठी माध्यमाची शाळा गेल्या 2 वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नूतनीकरणाच्या कामासाठी ही शाळा बंद करण्यात आली होती, मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दररोज सुमारे 3 किलोमीटर पायी चालत दुसऱ्या शाळेत जावे लागत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सुरुवातीला या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परिसरातील एका हॉलमध्ये एकत्र बसवून शिकवले जात होते. मात्र अपुऱ्या जागेमुळे नंतर त्यांना तुळशेतपाडा येथील दुसऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत हलवण्यात आले. दुर्दैवाने, या दोन्ही ठिकाणांमधील अंतर सुमारे 3 किलोमीटर आहे आणि या मार्गावर शाळेच्या वेळेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.
(नक्की वाचा- Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?)
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या मार्गावरून एक बेस्ट बस धावते, पण ती फक्त दुपारीच उपलब्ध असते. त्यामुळे, सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते. या लांब आणि त्रासदायक प्रवासाला कंटाळून अनेक पालकांनी आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेतून काढून खासगी शाळांमध्ये दाखल केले आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: सीमा शुल्क अधीक्षक CBIच्या जाळ्यात, तब्बल 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं)
या गंभीर परिस्थितीवर शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी मुंबईच्या मनपा आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने नवीन शाळा इमारत बांधून खिंडीपाडा शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील आमदार शिवनाथ दराडे यांनी केली आहे. 1971 साली बांधलेली ही शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत आहे. याकडे मनपा कधी लक्ष देणार, हा प्रश्न आता स्थानिक रहिवासी आणि पालक विचारत आहेत.