Mumbai News : BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; 31 मेपर्यंत 'ही' कामं पूर्ण होणार, अश्विनी भिडेंचे निर्देश

नुकताच पदभार स्विकारलेल्या मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे अॅक्शन मोडवर आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 4 mins

Mumbai News : नुकताच पदभार स्विकारलेल्या मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे अॅक्शन मोडवर आल्या आहेत. सध्या मुंबईतील अनेक भागात बांधकामं सुरू आहे.  ही कामं लवकर पूर्ण करण्याचे निर्देश भिडे यांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वीच ही कामं पूर्ण करावी अशा सूचना अश्विनी भिडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. 

मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण असून जुलै २०२७ पर्यंत धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्यावी. शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करावे. रस्‍ते काँक्रिटीकरण कामे  करताना गुणवत्‍तेला प्राधान्‍य द्यावे. ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्‍याची कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्‍त्‍यांची सर्व कामे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करुन रस्‍ते वाहतुकीस खुले करावेत, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

Advertisement

महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज १६ एप्रिल २०२६ रोजी शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्‍यात धारावी येथील ४१८  दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्‍वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्‍हणून पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने केलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते.        

धारावी मलजल प्रक्रिया केंद्र   

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्यावतीने धारावी येथे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. श्रीमती भिडे यांनी या प्रकल्‍पाची पाहणी  केली. धारावी मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक प्रगती ६५ टक्के झाली आहे. जुलै २०२७ मध्‍ये हा प्रकल्‍प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्‍प सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर (SBR) तंत्रज्ञानावर आधारित आहे. अत्‍यंत कमी जागेत एकापेक्षा अधिक मजल्‍यांच्‍या इमारतीमध्‍ये प्रकल्‍प कार्यान्वित होणार आहे. मुंबई महानगरात एकूण ७ मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्‍याची प्रक्रिया सुरू असून धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र  सर्वात कमी जागेत बांधले जात आहे.

नक्की वाचा - BMC Rada: बाळासाहेबांचा अवमान, माफीसाठी कलगीतुरा, मुंबई महापालिकेत जोरदार राडा

या प्रकल्प अंतर्गत प्रवेशित सांडपाणी उदंचन केंद्र (Influent Pumping Station), स्‍लज रूम,  सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर प्रक्रियेसाठी उभारण्‍यात येणा-या टाक्‍या,  तृतीयस्तरीय शुद्धीकरण प्रक्रियेची (Tertiary Treatment) इमारत, गाळ प्रक्रिया (Sludge Digester) टाकी, सांडपाणी घेवून येणा-या बोगद्यास जोडलेला शाफ्ट आणि प्रक्रिया केलेले पाणी घेऊन जाणारा शाफ्ट या सर्व घटकांची पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी येणा-या स्‍थानिक अडचणींचा आढावा घेऊन त्‍यांचे समाधान करण्‍यात आले. कोणत्‍याही परिस्थितीत जुलै २०२७ मध्‍ये धारावी  मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता बाळगण्‍याचे निर्देश भिडे यांनी दिले.

शीव (सायन) उड्डाणपूल 

शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.

Advertisement

 रेल्‍वे विभागाकडून पोलादी तुळया स्‍थापित करण्‍याकामी (Girder Launching) १५ दिवसांचा विलंब झाला आहे. अगोदरच्‍या नियोजनानुसार दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत तुळया स्‍थापित करणे अपेक्षित होते. ते काम आता दिनांक १५ मे २०२६ पर्यंत लांबणीवर गेले आहे. पहिली तुळई स्‍थापित करण्‍याचे काम लांबणीवर गेले असले तरी इतर अनुषंगिक कामांमध्‍ये हा विलंब भरून काढावा आणि दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत दोन्‍ही तुळया स्‍थापित करण्‍याची कार्यवाही सुनिश्चित करावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. महानगरपालिका पूल विभाग आणि रेल्‍वे विभागांनी परस्‍पर समन्‍वय ठेवून दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्‍यावी, असेदेखील भिडे यांनी सांगितले. 

शीव (सायन) येथील  रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२६ अखेर एकूण १,७३६ रस्‍त्‍यांचे मिळून ४९६.८३ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत शहर विभागातील शीव येथील  रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. शीव पूर्व येथे २७ क्रमांकाच्‍या रस्‍त्‍याच्‍या मुख्‍य वाहतुकीच्‍या भागाचे काँक्रिटीकरण काम आणि रस्ता क्रमांक २५ (सी) येथील पदपथ कामाची त्‍यांनी पाहणी केली.  काँक्रिटीकरण कामे  करताना गुणवत्‍तेला प्राधान्‍य द्यावे. दिनांक ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्‍याची कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्‍त्‍यांची सर्व कामे पूर्ण करून दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत रस्‍ते वाहतुकीस खुले करावेत, असे निर्देश भिडे यांनी दिले.