विशाल पाटील, मुंबई
Mumbai News : दादर येथील आशिष इंडस्ट्रीज परिसरात कबुतरांना खाद्य देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. येथील काही जैन व्यापारी सातत्याने कबुतरांना खाद्य देत असल्याने परिसरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, असे करणे न्यायालयाच्या आदेशाचे थेट उल्लंघन असूनही, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आता खाद्य टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत कबुतरांना खाद्य देणे ही अनेक ठिकाणी एक सामान्य बाब झाली आहे. मात्र, यामुळे कबुतरांची संख्या अनियंत्रितपणे वाढत असून, या कबुतरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. कबुतरांच्या विष्ठेतून अनेक गंभीर आजार, विशेषतः श्वसनाचे आजार पसरतात, असे अनेक वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य देण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. तरीही दादरमधील जैन व्यापारी धार्मिक श्रद्धा आणि भूतदया या तत्त्वाचा भाग म्हणून कबुतरांना खाद्य देत आहेत.
(नक्की वाचा- Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना)
व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे रहिवाशांमध्ये मोठा संताप आहे. 'कबुतरांना खाद्य देण्याच्या या कृतीमुळे केवळ परिसरात अस्वच्छता पसरत नाही, तर घरातील व बाहेरील वस्तूंवर त्यांची विष्ठा पडून नुकसानही होते आहे. कबुतरांच्या सततच्या किलबिलाटामुळे मानसिक त्रासही होतो', असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. अनेकांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
(नक्की वाचा- UP News: कुत्र्याने चाटल्यामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू, कुटुबीयांना एक चूक नडली)
एकीकडे काही व्यापारी आपली श्रद्धा आणि धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे हा वाद आता न्यायालयात दिलेले आदेश आणि कायद्याचे पालन करण्याच्या दिशेने कसा पुढे जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रहिवाशांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून, आता पोलीस आणि प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.