गणेश पारडे
सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन चोरी याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातून अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतल्या जोगेश्वरीतही असाच एक प्रकार समोर आला आहे. यात मोबाईल लिंकद्वारे हॅकिंगचा प्रकार झाला आहे. त्यानंतर बँक खात्यातून परस्पर लाखो रूपये काढले गेल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील संतोषनगर परिसरातील प्रशांत रमेश कटारे हे राहातात. यांच्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 10 जुलै 2025 रोजी दुपारी, "RTO challan 500.apk" नावाची एक संशयास्पद लिंक त्यांच्या मोबाईलवर आली होती. ही लिंक त्यांनी उघडल्यानंतर त्यांना कार्ड आणि आधार क्रमांकासह माहिती भरायला सांगण्यात आली. हे करत असताना त्यांनी OTP दिला नाही. असं केलं तरी त्या लिंक द्वारे त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
त्यानंतर थोड्या वेळात त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. शिवाय तुम्ही तुमच्या फोनच्या माध्यमातून ₹1 लाख 08 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार करणार आहात का अशी विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर तो फोन कट झाला. फोन कट झाल्यानंतर प्रशांत कटारे यांच्या व्हॉट्सअप डीपीमध्ये बदल झाला. याबाबत त्यांच्या वाचनात अशा गोष्टी आल्या होत्या. त्यामुळे ते सतर्क झाले. शिवाय त्यांनी तात्काळ पोलिस स्थानकात धाव घेतली.
आपली फसवणूक तर झाली नाही ना असा संशय त्यांना आला. काही तरी गडबड दिसते असं त्यांना वाटलं. प्रशांत कटारे यांनी ओशिवरा येथील HDFC बँकेत आपल्या खात्याची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यातून दोन टप्प्यांत एकूण ₹1,08,000 रुपये परस्पर डेबिट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस आता हे कुणी आणि कसे केले याचा तपास करत आहेत.