Mumbai News : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबूतरखाना न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने बंद केला. मात्र कबुतरखाना बंद करू नये अशी मागणी जैन समाजाने केली आहे. या मागणीसाठी जैन बांधव 6 ऑगस्ट रोजी कबुतरखान येथे जमले होते. यावेळी जैन समुदायाने आक्रमक होत, न्यायालय आणि मंबई महापालिकेचे आदेश झुगारत आंदोलन केले होते.
मुंबई महापालिकेच्या कारवाईचा निषेध करत काही लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून कबुतरखान येथे धुडगूस घातला. दादर येथील कबूतरखाना बंद केल्यानंतर जमावाने केलेल्या तोडफोडीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी 150 हून अधिक लोकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आंदोलकांना आंदोलन महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा- Kabutar Khana News: कबुतरांना खाद्य कसे द्यावे? मुंबई महापालिकेने मागवल्या सूचना, तुमचे मत कसे नोंदवाल?)
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने केलेल्या या कारवाईविरोधात काही महिलांसह सुमारे 150 लोकांनी तेथे जमाव जमवला. या जमावाने चाकूने ताडपत्री फाडून बांबू उचकटून टाकले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी मुंबई महापालिकेने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून या घटनेची नोंद घेत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दंगल, बेकायदा जमावबंदी आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, व्हिडीओ फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा संदेश देण्यात आला आहे.