जाहिरात

Mumbai News : दर शुक्रवार बीकेसीसाठी ठरेल खास; बंगळुरूच्या धर्तीवर मुंबईतही राबवणार नवी योजना!

मुंबईची आर्थिक राजधानी असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) वाहतूक कोंडी आता लवकरच भूतकाळ ठरणार आहे.

Mumbai News : दर शुक्रवार बीकेसीसाठी ठरेल खास; बंगळुरूच्या धर्तीवर मुंबईतही राबवणार नवी योजना!

Mumbai News : मुंबईची आर्थिक राजधानी असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) वाहतूक कोंडी आता लवकरच भूतकाळ ठरणार आहे. बीकेसीमध्ये दररोज होणारी वाहतूक कोंडीची डोकेदुखी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) एक अभिनव पाऊल उचललं आहे. आता दर शुक्रवारी बीकेसीमध्ये 'पब्लिक ट्रान्सपोर्ट डे' पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'पब्लिक ट्रान्सपोर्ट डे' काय आहे? 

बीकेसीमध्ये हजारो कॉर्पोरेट कार्यालयं आहेत. दररोज लक्षावधी कर्मचारी येथे खाजगी वाहनांनी येत असतात, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होते. हे चित्र बदलण्यासाठी, कर्मचारी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, यासाठी एमएमआरडीएने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नक्की वाचा - Mumbai News : 248 कोटी खर्च, 7 वर्षे उभारणी; लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा बोजवारा

बीकेसीमधील व्यावसायिक ताण आणि कामाचे स्वरूप पाहता, शुक्रवार हा दिवस उपक्रमासाठी निवडण्यात आला आहे. आठवड्याच्या शेवटच्या कार्यदिवसाला कामाचा ताण तुलनेने कमी असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं सोयीचं पडेल आणि या उपक्रमाची सुरुवात करणं अधिक परिणामकारक ठरेल, असा एमएमआरडीएचा होरा आहे. 

मात्र या सगळ्यामुळे खरंच इथे कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत का? याचा विचार कसा झाला?

गोलमेज परिषदेत सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये फीडर बस सेवा अधिक मजबूत करणे, पादचारी सुविधा सुधारणे, मुंबई वन प्लॅटफॉर्मशी अधिक चांगलं एकत्रिकरण करणं, ट्रान्झिट हबजवळ समर्पित ऑटो रिक्षा सुविधा उपलब्ध करणे आणि शाश्वत वाहतूक पर्याय निवडणाऱ्या कर्मचायांना प्रोत्साहन देणारे कॉर्पोरेट प्रोत्साहन कार्यक्रम राबविणे यांचा समावेश आहे. बंगळुरुमध्ये राबविण्यात आलेल्या यशस्वी वर्तनबदल उपक्रमापासूनही या चर्चेला प्रेरणा मिळाली. अशा कॉरपोरेट मोबिलिटी कार्यक्रमांमुळे एका महिन्यात 36000 हून अधिक मेट्रो प्रवास नोंदवले गेले होते.

या उपक्रमामुळे काय बदल होईल? 

  • कर्मचाऱ्यांनी मेट्रो, बेस्ट बसेस आणि उपनगरीय रेल्वेचा वापर केल्यास बीकेसीतील रस्त्यांवरील खाजगी गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटेल.
  • कार्बन उत्सर्जन कमी होऊन बीकेसीचा परिसर अधिक 'ग्रीन' होण्यास मदत होईल
  • प्रवासाचा वेळ वाचणार, ट्रॅफिकमधून होणारी कर्मचाऱ्यांची दमछाक थांबल्यास कामाची उत्पादकताही वाढेल.

एमएम आरसी, एमएमएस ओसीएल, बेस्ट उपक्रम, मुंबई वाहतूक पोलीस, बीकेसी स्थित आघाडीच्या कंपन्या, बीकेसी मूव्हस कलेक्टरहवे सदस्य आणि गतिशीलता तज्ज्ञ या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. सर्वानी संयुक्त प्रयत्नाद्वारे शाश्वत गतिशीलता पुढे नेण्याची बांधिलकी व्यक्त केली. बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवरील आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. शासन संस्था, वाहतूक सेवा पुरवठादार, उद्योगक्षेत्र आणि नागरिक एकत्रितपणे काम केल्यास अधिक स्वच्छ, कमी गर्दीची आणि अधिक शाश्वत शहरी केंद्रेनिर्माण करता येऊ शकतात, हे या उपक्रमातून स्पष्ट होणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com