जाहिरात

Vashi APMC : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, वाशीच्या APMC मध्ये घडतोय धक्कादायक प्रकार

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ आणि भाजी मार्केटमध्ये पुन्हा पॅसेजमध्ये अनाधिकृतपणे शेतमाल विक्री सुरू झाली आहे.

Vashi APMC : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, वाशीच्या APMC मध्ये घडतोय धक्कादायक प्रकार

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ आणि भाजी मार्केटमध्ये पुन्हा पॅसेजमध्ये अनाधिकृतपणे शेतमाल विक्री सुरू झाली आहे. सचिव तथा पणन संचालक शरद जरे यांनी मागील काही महिन्यांपासून अनधिकृत गोष्टींवर चाप लावला आला होता; मात्र प्रशासनाने रात्रीचा दिवस करून अनधिकृत व्यापार करणाऱ्या २०० जणांचे पंचनामे करून संबंधिताचे परवाने निलंबित किंवा गाळे सिल करण्याची पुढील कारवाई झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने अनधिकृत व्यापार करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवते त्या पलीकडे काही करू शकत नाही ही गोष्ट स्पष्ट होऊ लागल्याने पुन्हा अनधिकृत व्यापाराने डोके वर काढले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत बेकायदेशीर गाळा भाड्याने...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीमध्ये फळ, भाजीपाला, कांदा बटाटा, धान्य आणि मसाला या पाच बाजारपेठांचा समावेश आहे. दरम्यान ऑक्टोबर २०२५ पासून शरद जरे यांनी या बाजार समितीची सचिव पदाची धुरा सांभाळली त्यानंतर भाजीपाला आणि फळ मार्केट मधील मोठ्या प्रमाणावर चालू असलेली अनियमितता यावर अंकुश लावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. अनेक गाळा मालकांनी परवाना नसणाऱ्या ५ ते ६ जणांना बेकायदेशीरपणे गाळा भाड्याने दिले होते. फळ आणि भाजी मार्केटमध्ये अशाप्रकारे गाळा भाड्याने देऊन महिन्याला ८० हजार रुपये ते सव्वा लाख रुपये भाडे घेणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या ७० टक्केहून अधिक असल्याचे बोलले जाते.

नक्की वाचा - Weather Alert : पर्यटकांना अलर्ट, 'या' दिवशी चुकूनही समुद्राजवळ जाऊ नका!

बेकायदेशीरपणे अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉलची संख्याही वाढली

अशा गाळाधारकांचे पंचनामे देखील करण्यात आले आहेत. हे अनधिकृत व्यापारी बाजार पेठेतील मुख्य मार्ग, पॅसेज, शेतमाल चढ उतार करण्यासाठीचे धक्के येथे चालणारी शेतमालाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची कारवाई चालू केली होती. तसेच त्यांचे पंचनामे करून परवानाधारक व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून गाळे सील करण्यात येणार असल्याची आवई बाजार आवारात उठवण्यात आली होती. बाजार पेठेतील मुख्य मार्ग, पॅसेज, शेतमाल चढ उतार करण्यासाठीचे धक्के येथे चालणारी शेतमालाची विक्री ९० टक्के बंद करण्यात यश आले होते. पॅसेजमधील अवैध खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद झाले होते. मात्र मागील महिन्यात शरद जरे यांना पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तेव्हापासून कामाचा व्याप वाढल्याने पंचनामा करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांवर पुढील कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी कारवाई केली जाऊ नये म्हणून राजकीय दबाव देखील आणण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई थांबल्याची चर्चा आहे.

परिणामी पुन्हा या दोन्ही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी पॅसेजमध्ये, धक्क्यावर, मुख्यमार्गामध्ये शेतमाल विक्री चालू केली आहे. तसेच बेकायदेशीरपणे अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉलची संख्याही वाढू लागली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com