Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट

Mumbai-Pune Greenfield Expressway: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण करण्यासाठी NHAI ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सध्याच्या एक्सप्रेसवेला समांतर असा 130 किलोमीटरचा नवीन 'ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग' उभारण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड

Pune News: मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्याच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ अवघ्या 90 मिनिटांवर (दीड तासावर) आणण्यासाठी 'भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने' (NHAI) एक महाकाय योजना आखली आहे.

सध्याच्या मार्गाला समांतर असा नवीन 130 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग (Greenfield Expressway) उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्यासाठी (DPR) प्राधिकरणाने अधिकृत निविदा  मागवल्या असून, या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

कसा असेल नवीन महामार्गाचा मार्ग?

NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्तावित नवीन महामार्ग पूर्णपणे हाय-स्पीड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हा संपूर्ण मार्ग 8-पदरी असणार आहे, ज्यामुळे वाहनांचा वेग आणि सुरक्षा दोन्ही वाढेल. हा मार्ग रायगड जिल्ह्यातील 'चौक' येथून सुरू होणार असून, तो जेएनपीटी (JNPT) बंदर ते चौक या मार्गाशी जोडला जाईल. पुढे हा मार्ग पुण्याच्या दिशेने जात पुणे बाह्यवळण मार्गावरील (Ring Road) भोर तालुक्यातील 'शिवरे' गावापाशी संपेल.

थेट 'अटल सेतू'शी जोडणार

या नवीन ग्रीनफिल्ड मार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या प्रकल्पामुळे पुणे शहर थेट मुंबईच्या 'अटल सेतू'शी जोडले जाणार आहे. यामुळे मुंबई शहर, नवी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या जुन्या एक्सप्रेसवेवर न जाता थेट आणि विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

(नक्की वाचा-  Rain Alert: कोकणात मेघगर्जनेसह पावसाची अंदाज, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा)

"सध्याच्या एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी हा हाय-स्पीड मार्ग तयार केला जात आहे. यामुळे सध्याच्या मार्गावरील ताण कमालीचा कमी होईल आणि आंतर-शहरी प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवर येईल", असं NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी म्हटलं.

या 15000 कोटींच्या नवीन प्रकल्पामुळे केवळ मुंबई-पुण्यातील अंतरच कमी होणार नाही, तर दोन्ही शहरांमधील आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही एक नवीन गती मिळणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Topics mentioned in this article