जुई जाधव / यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी
महाराष्ट्रात एकाच वेळी दोन परस्परविरोधी हवामानाचे प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असून तिथे उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) या संदर्भातील सुधारित अंदाज जाहीर केला आहे.
कोकण आणि घाट परिसरात पावसाचा 'येलो अलर्ट'
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने त्यांच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान विभागाने या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा फटका
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण असतानाच, विदर्भातील नागरिकांना मात्र तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने येथे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.
यंदाच्या मॉन्सूनची कशी आहे प्रगती?
हवामान विभागाने मॉन्सूनच्या वाटचालीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामाची सुरुवात 16 मे रोजी झाली असून प्रारंभी मॉन्सूनने अत्यंत वेगाने प्रगती केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेटे, पूर्व-मध्य बंगालचा उपसागर, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण भारताचे किनारी भाग आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडील कोमोरिन परिसर व्यापला होता.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
सुरुवातीच्या वेगवान प्रवासानंतर मॉन्सूनची आगेकूच काही काळासाठी मंदावली होती. शनिवारी मॉन्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग व्यापला असून नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात तो पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच अंदमान समुद्राचा बहुतांश भाग आता मॉन्सूनच्या प्रभावाखाली आला आहे.
26 मे रोजी केरळात आगमन?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 26 मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस देशभरातील पावसाचा सुधारित आणि सविस्तर अंदाज जाहीर केला जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world