सुरज कसबे, प्रतिनिधी
Mumbai-Pune Expressway : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर द्रुतगती महामार्गावर झालेल्या गॅस टँकरच्या अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा उडाला होता. नागरिकांना ३६ तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-पुणे महामार्गावर ३-४ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत ४० ते ५० किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासना दरम्यान, लोणावळा पोलिसांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
माणुसकी जपणारं रुप....
कर्तव्यासोबतच माणुसकी जपणारे पोलिसांचे हे रूप पाहून नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ३-४ फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ टँकर पलटी झाल्यामुळे तब्बल ३६ तास वाहतूक ठप्प झाली होती. गाड्यांच्या लांबच लांब रांगांमुळे लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे खाण्यापिण्याविना प्रचंड हाल झाले होते. प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्याचं हे बोलक चित्र महामार्गावर पाहायला मिळालं.
केवळ वाहतूक सुरळीत करण्यावर न थांबता, पोलिसांनी स्वखर्चाने आणि पुढाकाराने प्रवाशांना पाणी, बिस्किटे आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की वाटप केली होती. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या लहान मुलांसाठी ही मदत मोलाची ठरली. वाहतूक कोंडीत अडकलेला नागरिक सामान्यतः संताप व्यक्त करत असतो, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. या मदतकार्याचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलीस केवळ दंड आकारण्यासाठी नसून मदतीसाठीही सदैव तत्पर असतात, अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world