सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटननगरी लोणावळा येथील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या 'मॅप्रो गार्डन'च्या रेस्टॉरंटमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विकल्या गेलेल्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे लोणावळ्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक पर्यटक मॅप्रोच्या आउटलेटवरून खरेदी केलेल्या पिझ्झाच्या स्लाईसमध्ये जिवंत किडे दाखवताना दिसत आहे. व्हिडिओ तयार करणाऱ्या पर्यटकाने प्रसिद्ध मॅप्रो ब्रँडच्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि गुणवत्तेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. मोठ्या विश्वासाने आणि आनंदाने मॅप्रो गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये या व्हिडिओमुळे तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
FDA कडून चौकशीची मागणी
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. मॅप्रोच्या स्वयंपाकघराची पाहणी करून अन्नाचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असा सूर उमटत आहे.
(नक्की वाचा- सिनेमागृहात तुफान राडा! मैत्रिणीसोबत 'स्पायडर-मॅन' सिनेमा पाहायला आलेल्या तरुणाला प्रेक्षकांनी तुडवलं)
अधिकृत पुष्टी नाही
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमधील दाव्यांची मॅप्रो गार्डन व्यवस्थापन किंवा एफडीए प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे आणि त्यात कितपत तथ्य आहे, हे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीनंतर आणि अधिकृत अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकारामुळे सध्या लोणावळ्यातील पर्यटन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world