Mumbai Pune Expressway : गेल्या २२ तासांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीची खोळंबा झाला आहे. काही काळासाठी मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. ३ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन वाहतुकीवर परिणाम झाला असून अद्यापही येथील काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान गॅसचा टँकर पलटी झाला होता. या टँकरमधील प्रोपलिन गॅस लिक झाला होता. त्यानंतर पुढील बराच वेळ टँकरमधील गॅस लिक होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली होती.
प्रोपलिन गॅस काय आहे अन् किती धोकादायक?
प्रोपलिन एक रंगहीन आणि ज्वलनशील वायू आहे. पेट्रोकेमिकल उद्योगात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचा मुख्य वापर प्लास्टिक, रसायने आणि इंधन म्हणून केला जातो. हा वायू अत्यंत उपयुक्त असला तरी त्याचे काही गंभीर धोके आहेत. प्रोपलीन हा अतिशय लवकर पेट घेणारा वायू आहे. हवेमध्ये थोड्या प्रमाणात जरी हा वायू मिसळला आणि तिथे ठिणगी किंवा उष्णता आली, तर मोठा स्फोट होऊ शकतो. हा वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे तो जमिनीलगत साचून राहतो आणि दूरपर्यंत पसरू शकतो.
प्रोपलीन हा वायु विषारी नसला तरी, जर तो बंद खोलीत साचला तर हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी करतो. यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जास्त प्रमाणात श्वास घेतल्यास चक्कर येणे, गुंगी येणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे या वायुची गळती झाल्यास लगेच विद्युत उपकरणे बंद करावीत आणि ती जागा रिकामी करावी, असं सांगितलं जातं.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सद्याची परिस्थिती काय आहे?
प्रोपलिन टँकरच्या समोरील केबिन बाजूला घेण्यासाठी काही काळ दोन्ही बाजूंनी जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. सध्या यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, लवकरात लवकर गॅस टँकरही बाजूला करण्याचे प्रयत्न संबंधित यंत्रणांकडून सुरू आहेत.
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world