Mumbai News: मोहर्रमच्या मिरवणुकीत संशयास्पद कॅप्सूलचं वाटप; काहींची तब्येत बिघडली, कॅप्सुलमध्ये काय होतं?

Mumbai News: मुंबईतील रे रोड भागात मोहर्रमच्या अशुरा मिरवणुकीदरम्यान नागरिकांना संशयास्पद कॅप्सूल वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, मुंबई

मुंबईतील रे रोड परिसरातील रेहमताबाद कब्रस्तानाजवळ मोहर्रमच्या अशुरा मिरवणुकीत एक खळबळजनक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना काही अज्ञात इसमांकडून संशयास्पद कॅप्सूल वाटले जात होते. या कॅप्सूलच्या सेवनाने काही लोकांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका जागरूक महिलेच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.

कॅप्सूल उघडताच उडाली धावपळ

मिळालेल्या माहितीनुसार, रेहमताबाद कब्रस्तानाजवळ चार जण मिरवणुकीतील नागरिकांना एकत्र करून काही कॅप्सूल वाटत होते. मिरवणुकीत सहभागी एका महिलेला या प्रकाराचा संशय आल्याने तिने कॅप्सूल वाटणाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा संबंधित व्यक्तींनी हे “इम्युनिटी बूस्टर” असून आरोग्य सुधारण्यासाठी असल्याचा दावा केला.

Advertisement

(नक्की वाचा-  MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?)

लाल पावडर आढळली

संशय न फिटल्याने त्या महिलेने एक कॅप्सूल उघडून पाहिले. तेव्हा त्या कॅप्सूलच्या आत लाल रंगाची अज्ञात पावडर आढळली. यामुळे महिलेचा संशय अधिक बळावला आणि तिने वेळ न घालवता तात्काळ मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

मोठ्या प्रमाणात कॅप्सूल जप्त

माहिती मिळताच भायखळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. तर त्याचे इतर तीन साथीदार पळून गेल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळावरून आणि संशयिताकडून मोठ्या प्रमाणात कॅप्सूल साठा जप्त केला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी हे कॅप्सूल मिरवणुकीतील अनेक नागरिकांना वाटण्यात आले होते. हे कॅप्सूल खाल्ल्यामुळे काही लोकांची प्रकृती खालावल्याचे वृत्त असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते.

(नक्की वाचा-  Accident Time: सावधान! रात्रीचा 'हा' एक तास प्रवासासाठी सर्वात धोकादायक; रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर)

कॅप्सूलमध्ये विष होते? पोलिसांचा तपास सुरू

जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमध्ये नेमका कोणता रासायनिक किंवा हानिकारक पदार्थ आहे, हे शोधण्यासाठी ते नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या पावडरचे सत्य समोर येईल.

Advertisement

या कॅप्सूलमध्ये विषारी पदार्थ होता की नाही, याला अद्याप भायखळा पोलिसांनी अधिकृत पुष्टी दिलेली नाही. मात्र, मोहर्रमसारख्या मोठ्या बंदोबस्ताच्या आणि गर्दीच्या कार्यक्रमात असा प्रकार घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. हे कृत्य घातपाताच्या उद्देशाने केले होते का? या रॅकेटच्या मागे आणखी कोण आहे? याचा शोध भायखळा पोलीस घेत आहेत.

Topics mentioned in this article