जाहिरात

MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?

MPSC च्या सर्व पूर्व परीक्षा 'काँप्युटर बेस्ड टेस्ट' प्रणालीद्वारे घेतल्या जाणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे आणि एकाच वर्षात संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करणे, हे आयोगाचे उद्दिष्ट आहे.

MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणारा मोठा विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता पारंपरिक 'ओएमआर' (OMR) म्हणजेच पेन-पेपर पद्धतीऐवजी 'काँप्युटर बेस्ड टेस्ट' (CBT) या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी या मोठ्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

नवीन सुधारणांनुसार, परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे आणि एकाच वर्षाच्या आत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. उमेदवारांचे हित आणि वेळेची बचत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे भिमनवार यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Mysterious Blue Hole: खोल समुद्रात सापडलं 3200 वर्ष जुनं अनोखं विश्व; शास्त्रज्ञही झाले चकीत!)

'गट-क' च्या 2619 पदांसाठी पहिली ऑनलाइन परीक्षा

आयोगाने 25 जून रोजी 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' ची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 2619 पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

  • लिपिक-टंकलेखक: 1864 पदे
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक: 461 पदे
  • कर सहायक : 282 पदे
  • उद्योग निरीक्षक: 9 पदे
  • तांत्रिक सहायक : 3 पदे

या भरतीसाठी 27 जून ते 17 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील आणि 27 सप्टेंबर 2026 रोजी पहिली ऑनलाइन संगणक आधारित पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

पेपर लीक आणि घोटाळ्यांची भीती

एमपीएससीने भरती प्रक्रिया आपल्या हाती घेतल्याचे स्वागत केले असले, तरी परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयावर 'एमपीएससी समन्वय समिती' आणि विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. खासगी एजन्सींमार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षांमध्ये यापूर्वी पेपर लीक, तोतया उमेदवार बसवणे आणि तांत्रिक गैरप्रकार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  VIDEO: भयंकर! धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)

ऑनलाइन परीक्षा अनेक सत्रांमध्ये घ्यावी लागते. त्यामुळे गुणांचे समानीकरण करण्यासाठी 'नॉर्मलायझेशन' पद्धत वापरली जाते. ही पद्धत अपारदर्शक असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

ऑनलाइन परीक्षा केंद्रांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूरच्या शहरांमध्ये जावे लागते, ज्यामुळे त्यांचा प्रवास आणि राहण्याचा खर्च वाढतो. तसेच, परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन होणे किंवा संगणक बंद पडणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्वी ऑफलाइन ओएमआर (OMR) पद्धतीने 'गट-क' च्या मोठ्या परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असताना, अचानक ऑनलाइनचा हट्ट कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com