मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रस्ते काँक्रिटीकरण कामांचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून काँक्रिट ओतण्याची कामे (PQC) दिनांक २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करावीत. त्यानंतर जे५ जून २०२५ पर्यंत रस्त्यांचे क्यूरिंग आणि अंतिम कामे (फिनिशिंग) पूर्ण करता येतील. ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (Barricades) रस्त्यावर दिसता कामा नयेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागरिकांना सुरक्षित, खड्डेविरहित आणि वाहतूकयोग्य रस्त्यांची अनुभूती मिळावी, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक ती यंत्रणा व मनुष्यबळ तत्काळ कार्यान्वित करून रस्ते कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी विषयक कामाचा आढावा घेणारी बैठक आज (मंगळवार) पार पडली. त्यानंतर बोलताना बांगर म्हणाले की, प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. दिनांक ३१ मे २०२५ नंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकाही रस्त्याचे काँक्रिट काम सुरू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. चौक ते चौक (Junction To Junction) रस्ते काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. रस्ते खोदकामास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : बदलापूरकरांना मोठा दिलासा, रेल्वे स्टेशनवरील 'ती' अडचण दूर 'NDTV मराठी' च्या बातमीचा दणका )
एकूणच, पावसाळ्यात रस्ते वाहतूक सुरळीत सुरू राहिल, या दृष्टीने नियोजन करावे. दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) ची कामे सुरू राहिली तर त्यानंतर क्यूरिंगसाठी साधारणत: १४ दिवस आणि ‘फिनिशिंग'साठी ३ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. म्हणजेच, दिनांक १५ जून २०२५ च्या पुढेपर्यंत कालावधी वाढू शकतो. हे टाळण्यासाठी दिनांक २० मे २०२५ नंतर प्रत्यक्ष काँक्रिट टाकण्याचे कोणतेही काम हाती घेऊ नये. सुरू असलेले रस्ते काम पूर्ण करावे किंवा चौकापर्यंत आणून थांबवावे. कोणत्याही परिस्थितीत दिनांक ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (बॅरिकेडस्) रस्त्यावर आढळता कामा नये, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.
बांगर पुढे म्हणाले की, रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन कामांचा आढावा घ्यावा. महानगरपालिकेने निश्चित केलेल्या कालमर्यादेचे कंत्राटदारांमार्फत पालन होईल, हे सुनिश्चित करावे. काही अडचण आली तर, त्वरित वरिष्ठ स्तरावर ती निदर्शनास आणून द्यावी. दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत काँक्रिट कामे पूर्ण करून नागरिकांना होणारी असुविधा दूर करता येईल. मे महिन्याच्या उर्वरित कालावधीत होणा-या कामांचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त कामे पूर्ण करणे हा नाही, तर कोणतेही काम प्रलंबित न ठेवणे व नागरिकांना होणा-या असुविधेतून मुक्तता होणे हा आहे, याची रस्ते आणि वाहतूक विभागाच्या अभियंत्यांनी दक्षता घ्यावी, अस बांगर यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक रस्ता समतल व सुरक्षित करावा. ज्याठिकाणी काँक्रिट रस्ता आणि डांबरी रस्ता एकत्रित जोडला जाणार आहे, त्या ठिकाणची रस्ते पातळी समान असावी. पावसाळ्यात घसरण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसाळी पाणी रस्त्यांवर साचणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यांलगतच्या पर्जन्य जलवाहिन्या / नाले स्वच्छ आहेत का, त्यात बांधकामाचा राडारोडा पडला आहे का, असल्यास काढण्याचे नियोजन आदी बाबींची तपासणी करावी, असे निर्देशदेखील बांगर यांनी दिले आहेत.