मुंबईत आलेल्या परदेशी पाहुण्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका अमेरिकन पर्यटकाकडून टॅक्सी चालकाने अवघ्या 400 मीटरच्या प्रवासासाठी चक्क 18 हजार रुपयांचं भाडं आकारलं आहे. अर्जेंटिना अरियानो या अमेरिकन महिलेची फसवणूक झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच यशराज यादव उर्फ पप्पू या टॅक्सी चालकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अर्जेंटिना या 12 जानेवारी रोजी मध्यरात्री मुंबई विमानतळावर उतरल्या होत्या. त्यांना जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जायचे होते, ज्याचे अंतर अवघे 400 मीटर होते. आरोपी यादवने त्यांना थेट हॉटेलवर न नेता अंधेरी पूर्व परिसरात सुमारे 20 मिनिटे विनाकारण फिरवले. त्यानंतर त्याच परिसरातील हॉटेलवर सोडून त्यांच्याकडून 18 हजार रुपये वसूल केले. मायदेशी परतल्यानंतर अर्जेंटिना यांनी 26 जानेवारी रोजी सोशल मीडियावर या 'स्कॅम'बाबत पोस्ट शेअर केली आणि मुंबई पोलिसांना टॅग केले.