मुंबईत आलेल्या परदेशी पाहुण्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका अमेरिकन पर्यटकाकडून टॅक्सी चालकाने अवघ्या 400 मीटरच्या प्रवासासाठी चक्क 18 हजार रुपयांचं भाडं आकारलं आहे. अर्जेंटिना अरियानो या अमेरिकन महिलेची फसवणूक झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच यशराज यादव उर्फ पप्पू या टॅक्सी चालकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अर्जेंटिना या 12 जानेवारी रोजी मध्यरात्री मुंबई विमानतळावर उतरल्या होत्या. त्यांना जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जायचे होते, ज्याचे अंतर अवघे 400 मीटर होते. आरोपी यादवने त्यांना थेट हॉटेलवर न नेता अंधेरी पूर्व परिसरात सुमारे 20 मिनिटे विनाकारण फिरवले. त्यानंतर त्याच परिसरातील हॉटेलवर सोडून त्यांच्याकडून 18 हजार रुपये वसूल केले. मायदेशी परतल्यानंतर अर्जेंटिना यांनी 26 जानेवारी रोजी सोशल मीडियावर या 'स्कॅम'बाबत पोस्ट शेअर केली आणि मुंबई पोलिसांना टॅग केले.
Landed in Mumbai recently,took a taxi to @HiltonHotels. The driver and another guy took us to an unknown location first, charged us $200 (₹18,000) and then dropped us at the hotel which was only 400m away. Taxi No:MH 01 BD 5405 @MumbaiPolice #scam @CPMumbaiPolice @MTPHereToHelp pic.twitter.com/4X1uNKW3jg
— Argentina Ariano (@ArgentinaAriano) January 26, 2026
(नक्की वाचा- VIDEO: "दादाला 'I Love You' सांग...", अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद)
'सुओ मोटो' अंतर्गत कारवाई
महिलेने औपचारिक तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शवली असली तरी, मुंबई पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःहून (Suo Moto) 28 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी यादवला अटक केली असून त्याचा चालक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आरटीओकडे (RTO) शिफारस केली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी फरार असून, पोलीस संबंधित ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाचीही चौकशी करणार आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे आवाहन
विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांनी नेहमी 'प्री-पेड' टॅक्सी किंवा अधिकृत ॲप्सचा (Ola/Uber) वापर करावा. कोणतीही फसवणूक झाल्यास तातडीने 100 नंबरवर किंवा जवळच्या पोलीस चौकीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world