मुंबई आणि नवी मुंबई या दोन महानगरांतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट जोडणाऱ्या 'मेट्रो 8' प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सिडकोमार्फत उभारला जाणारा हा प्रकल्प नवी मुंबई महापालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्थेचे जाळे पूर्णपणे बदलणार आहे, अशी माहिती सिडकोने दिली.
प्रकल्पाची व्याप्ती आणि खर्च
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान 'मेट्रो 8' मार्गिका अंदाजे 35 किलोमीटरची असणार आहे.
- या मार्गाच्या उभारणीसाठी सुमारे 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून, आर्थिक नियोजनही निश्चित झाले आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
नवी मुंबईतील 10 स्थानके
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, 'मेट्रो 8' प्रकल्पात एकूण 20 स्थानके प्रस्तावित आहेत. यापैकी 10 स्थानके ही नवी मुंबई महानगरपालिका परिसरात उभारली जातील, ज्यामुळे शहरांतर्गत मेट्रो मार्गाचे जाळे विणले जाईल. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर 1, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर ही सात प्रमुख स्थानके नवी मुंबईत असतील. या व्यतिरिक्त सीवूड्स येथील महापालिकेच्या वंडर्स पार्क परिसरात मेट्रोसाठी थांबा दिला जाणार आहे. वाशी खाडी पूल ओलांडून सायन-पनवेल महामार्गाच्या दिशेने हा मार्ग पुढे सरकेल आणि नेरूळ, सीवूड्स या उपनगरांच्या अंतर्गत भागातून नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने नेण्यात येईल. तेथून अपोलो रुग्णालयाजवळून ही मेट्रो पुढे जाईल. लोकसत्ता वृत्तपत्राने याबाबचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- kalyan News: "मराठी बोलायला लाज वाटते का?", ट्रेनमधील मारहाणीनंतर तणावातून मराठी तरुणाची आत्महत्या)
एमएमआरडीएचा समावेश
'मेट्रो 8' MMRDA च्या 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिडको व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प दोन महानगरातून जाणार असला तरी, नवी मुंबई विमानतळाला तो वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांनी जोडला जाईल. 'मेट्रो 8' प्रकल्प नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराच्या विकासासाठी पूरक ठरेल. नवी मुंबई महापालिका हद्दीतील रहिवाशांना मुंबईच्या दिशेने ये-जा करण्यासाठी यामुळे आणखी एक महत्त्वाचा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.