- जुई जाधव, प्रतिनिधी
Mumbai Water Tanker Strike: मुंबईकरांवरील पाण्याचे संकट आता अधिक गडद आणि गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आणि प्रशासन यांच्यात झालेली महत्त्वाची बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात असून कोणतीही लेखी हमी देण्यास नकार देण्यात आल्यामुळे टँकर असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी रविवार (7 जून) मध्यरात्रीपासून पुकारलेला अनिश्चितकालीन संप मागे घेण्यास असोसिएशनने स्पष्ट नकार दिला असून तो पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच 10 टक्के पाणी कपातीचा (Mumbai Water Cut News) सामना करणाऱ्या मुंबईत सोमवारपासून (8 जून) पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लेखी उत्तरांशिवाय संप मागे नाही; बैठकीत काय घडलं? | Water Tanker Association
वाढत्या पोलीस कारवाया आणि केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या कडक नियमांविरोधात टँकर चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, टँकर असोसिएशनचे पदाधिकारी, संबंधित शासकीय अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत टँकर असोसिएशनने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी "आम्ही या मागण्यांवर लेखी उत्तर देऊ शकत नाही," अशी भूमिका घेतल्यामुळे कोंडी निर्माण झाली. तोडगा न निघल्याने मुंबईत टँकर असोसिएशनचा संप सुरूच राहणार आहे.
वॉटर टँकर चालकांनी संप का पुकारला आहे?
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या या अचानक पुकारलेल्या संपामागील मुख्य कारण केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे कडक नियम, पोलीस/प्रशासनाची कारवाई आणि टँकर चालकांविरुद्ध दाखल होणारे एफआयआर (गुन्हे) हे आहे. टँकर मालक बऱ्याच काळापासून या नियमांमध्ये शिथिलता देण्याची आणि टँकर व्यवसायासाठी एक स्पष्ट धोरण बनवण्याची मागणी करत आहेत.
80 वर्षे जुन्या सेवेवर संकट
असोसिएशनचा दावा आहे कि, मुंबईत वॉटर टँकर सेवा गेल्या सुमारे 80 वर्षांपासून लोकांची गरज पूर्ण करत आहे. ही सेवा विशेषतः अशा भागांसाठी महत्त्वाची आहे, जिथे नियमित महानगरपालिकेचा पाणीपुरवठा पुरेसा नसतो.
(नक्की वाचा : Dadar News: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दादरमध्ये बसने गाड्यांना कसं उडवलं? पाहा CCTVसह दुर्घटनेचे 11 PHOTOS)
कोणत्या ठिकाणी सर्वाधिक परिणाम होईल?
टँकर संपाचा सर्वाधिक परिणाम या ठिकाणी होऊ शकतो:
- हाऊसिंग सोसायटी
- उंच निवासी इमारती
- हॉस्पिटल
- शाळा आणि कॉलेज
- मॉल आणि हॉटेल्स
- औद्योगिक वसाहती (युनिट्स)
यापैकी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे टँकरवर अवलंबून असतो.
(नक्की वाचा :VIDEO: ऐन उन्हाळ्यात पहाटेपर्यंत छळ! नवी मुंबईच्या उलवेतील तरुणीचा तो VIDEO VIRAL, ढसाढसा रडत सत्य उजेडात आणलं)
टँकर युनियनच्या मुख्य मागण्या काय आहेत?
संपामागे मुख्य कारण केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे (CGWA) नियम असल्याचे सांगितले जात आहे. नियमांचे कडक आणि निवडक पद्धतीने पालन करून घेतले जात आहे. यामुळे टँकर व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. टँकर ऑपरेटरच्या अशा मागण्या आहेत की:
- भूजल नियमांमध्ये व्यावहारिक शिथिलता आणावी
- टँकर उद्योगासाठी स्पष्ट धोरण तयार केले जावे
- पोलीस आणि प्रशासकीय कारवाई थांबवली जावी
- चालकांवर दाखल होत असलेल्या एफआयआरवर (FIR) पुनर्विचार व्हावा