रिजवान शेख, ठाणे
Thane Election : आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असून, यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
'ठाकरे बंधू' एकत्र येणार?
ठाणे शहरात शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: 'असले धंदे खपवून घेऊ नका!' पिंपरी-चिंचवडमधील सभेत अजित पवारांचा भाजपवर थेट निशाणा)
कसं असेल जागावाटप?
ठाणे शहरात ठाकरे गट साधारणपणे 50 ते 55 जागांवर, तर मनसे 30 ते 35 जागांवर निवडणूक लढवू शकते. काही प्रभागांमध्ये मनसेचे उमेदवार 'मशाल' चिन्हावर, तर ठाकरे गटाचे उमेदवार 'इंजिन' चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कळवा-मुंब्र्यात शरद पवारांची 'तुतारी' घुमणार
जितेंद्र आव्हाड यांचा प्रभाव असलेल्या कळवा आणि मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पूर्ण ताकतीने उतरणार आहे. उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव असलेल्या वॉर्डांमध्ये मनसेतील काही लोकप्रिय चेहऱ्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या 'तुतारी' चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. यामुळे मतांचे ध्रुवीकरण टाळता येईल, असा अंदाज आहे.
या नव्या समीकरणात काँग्रेसला मात्र मोठा त्याग करावा लागण्याची शक्यता असून, त्यांना केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागेल, अशी माहिती मिळत आहे.