देशाच्या संरक्षणासंबंधित गोपनीय माहिती दुसऱ्या देशाला पुरविण्याच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगणारे ब्रम्होसचे माजी वैज्ञानिक निशांत अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यूपी-एटीएसचे तपास अधिकारी पंकज अवस्थी यांनी या प्रकरणाशीसंबंधित माहिती दिली. त्यांनी दिलेली माहिती हैराण करणारी आहे.
पंकज अवस्थीने न्यायालयाला सांगितलं की, पाकिस्तानी महिला सेजलच्या सांगण्यावरून निशांत अग्रवालने 2017 मध्ये तिने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं होतं. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सेजलने निशांत अग्रवाल याच्या खाजगी लॅपटॉपमध्ये तीन अॅप इन्स्टॉल केले. क्यूव्हिस्पर, चॅट टू हायर आणि एक्स-ट्रस्ट हे तीन अॅप इन्स्टॉल करण्यात आले. तिन्ही अॅप्लिकेशनमध्ये मॅलवेअर होतं, ज्यामुळे निशांतच्या लॅपटॉपमधील डेटा चोरण्यात आला. या डेट्यात गोपनीय माहितीदेखील होती.
टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, निशांतच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत, असा दावा करण्यात आला असून हे बीएपीएलच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारं असल्याचं तपासात समोर आलं आहे. निशांतने लिंक्ड-इनवर सेजलशी चॅटही केले होते, जिथे त्याने तिला हेस एव्हिएशन, यूके येथे रिक्रूटर म्हणून कामावर घेण्यास इच्छूक असल्याचं दर्शवलं होतं.
या तीन अॅपच्या मदतीने अनेकांना जाळ्यात अडकवलं...
यूपी-एटीएसचे तपास अधिकारी पंकज अवस्थीने निशांतच्या सुनावणीदरम्यान आपल्या जबाबात सांगितलं की, सेजल नावाच्या एका पाकिस्तानी महिलेने फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी ग्रुपसह मिळून येथील अनेक भारतीयांना टार्गेट केलं. ती भारतातील संरक्षण कर्मचाऱ्यांना टार्गेट करीत होती. आधी त्यांच्याशी मैत्री आणि या तीन अॅपच्या साहाय्याने डेटा चोरत होती. तिने आणखी काही कर्मचाऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केली होती.
नक्की वाचा - PM मोदी आणि पोप यांचा फोटो शेअर करुन फसली काँग्रेस, माफी मागण्याची आली वेळ
निशांतला कसं केलं अटक?
निशांतला ऑक्टोबर 2018 मध्ये मिलिट्री इंटेलिजेन्स आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील एटीएसच्या संयुक्त अभियानाअंतर्गत अटक करण्यात आली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या भारत-रशियन संयुक्त उपक्रम असलेल्या BAPL च्या तांत्रिक संशोधन विभागात तो कार्यरत होता. ब्रम्होस एअरोस्पेस हा संरक्षण संशोधन आणि विकास संघटना सोबतच रशियन मिलिटरी इंडस्ट्रियल कन्सोर्टियम (NPO Mashinostroyeniya) यांचा संयुक्त उपक्रम आहे.
या वर्षी आजीवन कारावासाची शिक्षा...
निशांत अग्रवाल पाकिस्तानाच्या सैन्याला गोपनीय डेटा पुरविण्याच्या आरोपाखाली जिल्हा सत्र न्यायालयाने या वर्षाच्या सुरुवातीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. निशांत नागपुरात मिसाइल असेंम्बली युनिटमध्ये काम करीत होता. पुरस्कार विजेता मिसाइल इंजिनियर निशांतला सत्र न्यायालयाने कलम 235 अंतर्गत दोषी ठरवलं होतं. तो IT कायद्याच्या कलम 66(f) आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट (OSA) च्या विविध कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी दोषी आढळला होता, ज्यामध्ये शस्त्रास्त्रांबद्दलची महत्त्वाची माहिती विदेशी शक्तींना लीक करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world