नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता नागपूरच्या महाल परिसरातील गाडीखाना आणि जोहरीपुरा भागात एका टोळक्याने मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. आपल्या एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्याच्या रागातून तरुणांनी धारदार शस्त्रांसह परिसरात दहशत निर्माण करत अनेक दुचाकींची तोडफोड केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या वादाची ठिणगी सोशल मीडियावरून पडली होती. आरोपी तरुणाच्या 'एक्स गर्लफ्रेंड'ची दुसऱ्या एका मुलाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या मैत्रीमुळे आरोपी आणि त्या मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादाचा सूड उगवण्यासाठी मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास आरोपीने आपल्या 12 साथीदारांसह गाडीखाना परिसर गाठला.
(नक्की वाचा- Dombivli News: 10 बिअर, 45 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; नर्सने बोलणे बंद केल्याने डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न)
हातात शस्त्रे आणि गाड्यांची तोडफोड
हे तरुणांचे टोळके हातात तलवार आणि इतर धारदार शस्त्रे घेऊन आले होते. त्यांनी परिसरात आरडाओरडा करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अर्धा डझनहून अधिक दुचाकींची शस्त्रांच्या सहाय्याने मोडतोड केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
स्थानिकांनी आरोपींना दिले पकडून
टोळक्याचा धुमाकूळ सुरू असतानाच परिसरातील नागरिक एकत्र आले. धाडस दाखवत स्थानिकांनी या टोळक्यातील काही जणांना रंगेहात पकडले आणि त्यांची चांगलीच धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
(नक्की वाचा- Actress Arrested: ग्लॅमरच्या आड काळा धंदा! सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक)
12 जणांचा सहभाग; अनेक आरोपी अल्पवयीन
या प्रकरणाचा प्राथमिक तपास गणेशपेठ पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात एकूण 12 तरुणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.