मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडालंय, मुलं चिडचिडी झालीयत, अशा अनेक तक्रारी आपण ऐकतो. नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केलीय. पूर्वा (बदललेले नाव) असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. पूर्वा तासनतास मोबाईल बघत बसायची. त्यामुळे अभ्यासाकडेही तिचं दुर्लक्ष झालं होतं.दहावीच्या अभ्यासाचं तिला टेन्शन आलं होतं, आपण नापास होऊ, अशी भीतीही तिला वाटू लागली होती.
पूर्वाला इन्स्टाग्रावर रिल्स आणि युट्युब शॉर्ट पाहण्याचा छंद लागला होता. छंद हळूहळू व्यसनात बदलत गेला.शाळेची परीक्षा जशी जवळ आली तशी पूर्वा भानावर आली. आपला अभ्यास झालेला नाही, आपण नापास होऊ अशी भीती तिला सतावायला लागली होती. काय करायचं ते पूर्वाला कळेनासं झालं होतं. भयंकर नैराश्याने घेरली गेलेली पूर्वा रविवारी रात्री जेवल्यानंतर तिच्या खोलीत गेली आणि तिनं गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे पूर्वाची आई उठली, तेव्हा तिच्या हा प्रकार लक्षात आला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. पूर्वानं आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे, या चिठ्ठीमुळे पूर्वाच्या मनात काय सुरू होतं याचा अंदाज येण्यास मदत झाली. पूर्वानं चिठ्ठीत लिहिलंय की,
पूर्वाचे वडील नागपूर पोलीस दलात कार्यरत आहेत. पूर्वाला एक लहान बहीणही आहे. पूर्वाची लहान बहीण आठवीमध्ये शिकते. पूर्वा मोबाईलच्या आहारी गेल्याचे कळाल्यानंतर तिचे आईवडील चिंतेत पडले होते. ते तिला वारंवार अभ्यास कर म्हणून सांगत होते, मात्र मोबाईलचे व्यसन लागलेल्या पूर्वाला काहीही सुचेनासे झाले होते.पूर्वाच्या आत्महत्येमुळे मुलांमध्ये वाढीस लागलेला मोबाईलचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पालकांनो वेळीच मुलांकडे लक्ष द्या
मुलांना मोबाईलचे व्यसन लागू नये यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात.
मुलांसाठी दिवसभरातला स्क्रीन टाईम ठरवून द्या
मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी, मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन द्या
जेवताना सगळ्यांनीच मोबाईल दूर ठेवा
मुलांना बक्षीस किंवा आमिष म्हणून मोबाईल हातात देऊ नका
पालक म्हणून तुम्ही मोबाईलचा अतिवापर करु नका, मुलं कायम तुमचं अनुकरण करतात हे लक्षात ठेवा
मुलांसोबत बोलण्यात, खेळण्यात जास्तीत जास्त वेळ घालवा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं अचानक चिडचिड करत असतील, त्यांच्या वागण्यात काही बदल झाला असेल, तर त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. त्यांच्यातली ही नैराश्याची लक्षणं ओळखा आणि नैराश्यातून बाहेर पडू शकतो, हा विश्वास मुलांना नक्की द्या