Nagpur News: नागपुरात उन्हाचा हाहाकार! 9 दिवसांत तब्बल 26 अज्ञात मृतदेह सापडले; उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा

Nagpur Heatwave News : नागपूर शहरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून गेल्या नऊ दिवसांत 26 अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विदर्भासह नागपूर शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. या कडकडत्या उन्हाचा सर्वात मोठा फटका रस्त्यावर राहणाऱ्या निराधार आणि उघड्यावरील लोकांना बसत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नागपूर शहरात गेल्या नऊ दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांवरून तब्बल 26 अज्ञात व्यक्तींचे मृतदेह जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळे म्हणजेच संशयित उष्माघातामुळे झाल्याची शंका वर्तवली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी आढळले मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे पासून नागपूर शहरात ठिकठिकाणी हे शव पोलिसांना मिळून आले आहेत. रस्त्यांच्या कडेला, उड्डाणपुलांखाली आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हे मृतदेह आढळून आले असून, या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

  • शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे एकूण 11 मृतदेह आणण्यात आले.
  • इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे एकूण 15 मृतदेह आणले आहेत.

तापमानाने गाठला 46.6 अंशांचा उच्चांक

गेल्या पंधरवड्यामध्ये नागपूरच्या हवामानात आणि तापमानात प्रचंड बदल झाला आहे. नागपूरचे तापमान 40 ते 42अंश सेल्सिअसवरून थेट 46.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या भीषण उष्णतेच्या लाटेमुळे उघड्यावर, पालावर आणि रस्त्यांच्या कडेला जगणाऱ्या गरिबांचे व मजुरांचे आयुष्य अत्यंत कठीण झाले आहे. दुपारच्या वेळी वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे (लू) आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

उष्माघाताची चर्चा, पण पुष्टी नाही

रुग्णालय आणि पोलीस वर्तुळात या मृत्यूंकडे 'संशयित उष्माघाताचे केसेस' म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या सर्व व्यक्तींचा मृत्यू खरोखरच उन्हाचा फटका बसल्याने झाला होता की अन्य काही कारणांमुळे, याची वैद्यकीय आणि कायदेशीर पुष्टी अद्याप झालेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, अवघ्या नऊ दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने मृतदेह सापडल्याने संपूर्ण नागपूर शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Topics mentioned in this article