- जुनी कामठी येथील अम्मा दर्गाह परिसरात संचालकासह सहा जणांवर जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप
- पश्चिम बंगालची तरुणी उर्ससाठी आली होती, तिला दर्गाह संचालकांने मारहाण आणि शोषण केल्याचा आरोप
- आरोपींनी तिला बुरखा घालायला लावले कलमा पडायला लावल्याचा ही आरोप
जुनी कामठी येथील प्रसिद्ध अम्मा दर्गाह परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दर्गाहचे संचालक आणि त्यांच्या मुलासह एकूण 6 जणांवर लैंगिक शोषण, हत्येचा प्रयत्न आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणल्याच्या आरोपांखाली कन्हान आणि कामठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 3 जण सध्या फरार आहेत. या प्रकणातील पीडित तरुणीने खळबळजनक आरोप केले आहेत. ही तरुणी पश्चिम बंगालची आहे. नागपुरातून सुटका करून ती बंगालला गेली. त्यानंतर तिथे तक्रा दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेली एक तरुणी जुनी कामठी येथील अम्मा दर्गाहमध्ये आयोजित 'उर्स' (धार्मिक उत्सव) मध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. या काळात दर्गाहचे संचालक ताजी तनविरूद्दीन, त्याचा मुलगा ताजी मुस्तफीउद्दीन, तेजस खोबरागडे आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून तिच्यावर विविध प्रकारे दबाव टाकला. तसेच तिचे लैंगिक शोषण करून हत्येचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवाय आपले धर्मांतरकरण्याचा प्रयत्न झाल्याचं ही तिने सांगितले आहे.
या तरूणीने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. हे लोक माझ्या मागे हात धुवून लागले होते. माझ्या सोबत त्यांनी चुकीचे केले. 18 तारखेला रात्री ते मला खोलीत घेवून गेले होते. तिथे मला खूप मारले. बॅट, लाटणं, चप्पल, ने मारहाण झाल्याचा आरोप तिने केला आहे. तिथेच कलमा वाचायला सांगितला. बुरखा घालायला लावला. उर्स हे अस्थेचे केंद्र आहे म्हणून तिथे गेली होती. पण आपल्यासोबत नको ते घडलं असं ही तिने सांगितलं आहे. आरोपींचे एक फार्म हाऊस आहे. तिथे ते मुलींना नेतात आणि धंदा करायला लावता असा आरोप ही तिने केला आहे. मला ठार मारण्याची धमकी ही देण्यात आल्याचं तिने म्हटलं आहे.
या छळातून महिलेने कशीतरी आपली सुटका करून घेतली आणि थेट कोलकाता गाठले. तेथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवली. सुरुवातीला कोलकात्यातील डमडम पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. घटनेचे गांभीर्य आणि कार्यक्षेत्र लक्षात घेऊन हे प्रकरण पुढील कारवाईसाठी नागपूरच्या कन्हान आणि कामठी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून मुख्य आरोपी ताजी तनविरूद्दीन, ताजी मुस्तफीउद्दीन आणि तेजस खोबरागडे या तिघांना अटक केली आहे. एफआयआरमध्ये बाबा ताजी जनवेखान, ताजी मुस्तफाखान बेग, बशारा फातिमा ताजी आणि मल्ला धुर्वे यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world