Nagpur News : सौरऊर्जा निर्मितीसाठी कडक उन्हाची किंवा प्रखर सूर्यप्रकाशाची गरज आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कारण, आता चक्क रात्रीच्या अंधारात किंवा ढगाळ वातावरणातही सौर पॅनलद्वारे सतत वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे. नागपूरच्या संशोधकांनी विज्ञानाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल टाकत सूर्याच्या प्रकाशाशिवाय 24 तास सौरऊर्जा निर्माण करण्याचे हे अनोखे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले आहे. या अप्रतिम संशोधनामुळे भविष्यात विजेच्या टंचाईवर मोठा मात करता येणार असून, या आंतरराष्ट्रीय शोधाची दखल घेत ब्रिटनने या तंत्रज्ञानाला 'युके डिझाइन'चे (UK Design) पेटंट प्रमाणपत्रही बहाल केले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांचा अभूतपूर्व प्रयोग
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोबळे आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे (LITU) प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तपणे हे नाविन्यपूर्ण संशोधन साकारले आहे. सध्या बाजारात दोन्ही बाजूने ऊर्जा निर्माण करू शकणारे 'बायफेशियल' सोलर पॅनल उपलब्ध आहेत. मात्र, सूर्यप्रकाश कमी झाल्यावर किंवा रात्र झाल्यावर त्यांची वीज निर्मिती पूर्णपणे थांबते. यावर मात करण्यासाठी या संशोधकांनी बायफेशियल सोलर पॅनलच्या वर आणि खाली विशेष स्वरूपाचे एलईडी (LED) दिवे बसवले आहेत.
( नक्की वाचा : Vande Bharat : मराठवाड्यातील 'या' रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत? केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी )
अशी होते सूर्याशिवाय रात्रीच्या वेळी वीज निर्मिती
दिवसाच्या वेळी वाऱ्यापासून मिळणारी पवनऊर्जा साठवून ठेवली जाते आणि रात्री सूर्यप्रकाश मावळताच एका सेन्सरच्या मदतीने हे एलईडी दिवे आपोआप सुरू होतात. या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशामुळे सोलर पॅनल रात्रीच्या अंधारातही पुन्हा सक्रिय होतात आणि सातत्याने वीज तयार करू लागतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी बाहेरून कोणतीही अतिरिक्त वीज घ्यावी लागत नाही. ही यंत्रणा स्वतःच निर्माण केलेल्या ऊर्जेवर पूर्णपणे मोफत आणि स्वयंचलित पद्धतीने काम करते.
भविष्यातील ऊर्जा संकटावर प्रभावी उपाय
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत मर्यादित होत असल्याने कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून रात्रंदिवस अखंड वीज तयार करणारे हे तंत्रज्ञान भविष्यात मैलाचा दगड ठरणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून घरांचे विजेचे बिल शून्यावर आणण्यासोबतच उद्योग आणि रस्त्यांवरील दिव्यांनाही 24 तास मोफत वीज पुरवणे शक्य होणार आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दोन्ही संशोधकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world