Nagpur News: पोलिसांना पाहताच 'चाकू' पळाला अन् जाळ्यात अडकला! नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Nagpur News: नागपूर शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला कुख्यात गुंड सोहेल अन्सारी उर्फ 'चाकू' याला तहसील पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपूर शहरात गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू असतानाच तहसील पोलिसांनी एका कुख्यात गुंडाला पुन्हा एकदा कोठडीची हवा दाखवली आहे. नागपूर शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी सोहेल मोईनुद्दीन अन्सारी उर्फ 'चाकू' याला तहसील पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली. पोलिसांना पाहताच पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या 'चाकू'चा पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

भांडण पाहायला उभा होता अन् पोलिसांवर नजर पडली

रविवारच्या रात्री नागपूरमधील डोबी नगर परिसरात दोन गटांत जोरदार भांडण सुरू असल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्याला मिळाली होती. माहिती मिळताच तहसील पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भांडण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत हद्दपार गुंड सोहेल अन्सारी उर्फ 'चाकू' देखील उभा होता. मात्र, पोलिसांची गाडी आणि कर्मचाऱ्यांना पाहताच त्याने घाबरून तिथून धूम ठोकली. पोलिसांना पाहून अचानक एक तरुण पळू लागल्याने पोलिसांना संशय आला. पोलीस शिपायांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग केला आणि त्याला अलगद पकडले.

Advertisement

(नक्की वाचा-  पिंपरी-चिंचवडमध्ये 'आय फ्लू'चा उद्रेक! पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले; डॉक्टरांचा गंभीर इशारा)

तपासात उघड झाले गुन्हेगारीचे कारनामे

पकडलेल्या तरुणाची चौकशी केली असता तो नागपूर शहरातून एक वर्षासाठी हद्दपार केलेला कुख्यात आरोपी सोहेल अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेगारी जगतात तो 'चाकू' या टोपण नावाने ओळखला जातो. प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो नागपूर शहरात बेकायदेशीरपणे वावरत होता. तो केवळ हद्दपारीचा नियम मोडून शहरात आला नव्हता, तर त्याच्यावर विनयभंग आणि मारामारी/दुखापत पोहोचवण्याचे गंभीर गुन्हे दाखल होते आणि या गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना चकवा देऊन फरार होता.

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)

हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि प्रलंबित गुन्ह्यांमध्ये फरार असणे याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना पाहून पळणारा हा 'चाकू' आता पुन्हा एकदा पोलीस लॉकअपमध्ये पोहोचला आहे.


Topics mentioned in this article