Nagpur Vande bharat train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या 10 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सकाळी 9 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार असून, याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस सेवांचाही प्रारंभ होईल.
नागपूर रेल्वे स्थानकावरून ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा असेल. यापूर्वी नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-सिकंदराबाद या दोन वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू आहेत. नागपूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ही सेमी-हायस्पीड एसी चेअर कार सेवा सुरू झाल्याने नागपूर व पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर 'वंदे भारत' एक्स्प्रेस डब्यांची संख्या वाढली; प्रवाशांना मोठा दिलासा)
वंदे भारत ट्रेनचा मार्ग आणि थांबे
नवीन वंदे भारत एक्सप्रेस अजनी (नागपूर) येथून सकाळी 9.50 वाजता सुटेल आणि रात्री 9.50 वाजता पुण्याला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सुरू राहील. सोमवारी नागपूरहून ट्रेन चालणार नाही पुण्याहून ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता सुटून, संध्याकाळी 6.25 वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
(नक्की वाचा- Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय?)
प्रवासाचे भाडे किती असणार?
प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार ही ट्रेन स्लीपर वंदे भारत असावी अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या ही सेवा एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. एसी चेअर कारचे भाडे सुमारे 1500 रुपये तर एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 3500 रुपये असणार आहे. 10 ऑगस्ट रोजी उद्घाटनानंतर, 14 ऑगस्टपासून वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा सुरू होईल.