प्रविण मुधोळकर, नागपूर
Nagpur News : अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेच्या अटकेसाठी नागपूर पोलिसांनी याचिक दाखल केली होती. या याचिकेवर पहाटे अडीच वाजता नागपूरच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. दंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून या महिलेला तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी या महिलेला अटक केल्याची माहिती झोन चारचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुनीता गटलेवार (43 वर्ष) नावाची महिला‘ऑपरेशन सिंदूर' सुरू असताना एका ख्रिश्चन (पास्टर) धर्मगुरूला भेटण्यासाठी अवैधरित्या पाकिस्तानात गेली होती. भारतीय कायद्यानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही. मात्र प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत मध्यरात्रीच न्यायाधीशांच्या निवासस्थानी या प्रकरणाची विशेष सुनावणी घेण्यात आली.
(नक्की वाचा - धक्कादायक! मुलावर उपचार करा, बाप सांगत राहीला, लेकाचा बेडवरच तडफडून जीव गेला)
जम्मू-काश्मीरमधील कारगिलजवळील हुंदरमन गावाच्या परिसरातून ही महिला नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून पाकिस्तानात गेली होती. नागपूर पोलिसांचे पथक तिला मध्यरात्री नागपूरला घेऊन आले आणि सरळ न्यायाधीशांच्या घरी तिला हजर करण्यात आले. पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी ही महिला नियंत्रण रेषा ओलांडून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
पाकिस्तानी रेंजर्सनी तिला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून बीएसएफकडे सोपवले होते. काही काळापासून ती पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूशी फोनवर चॅटिंग करत होती.
(नक्की वाचा - Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या आईवडिलांनी लेकीच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून डोळे होतील पांढरे)
पाकिस्तानात जाण्यापूर्वी तिने तिच्या 12 वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडून दिले होते. सध्या हा मुलगा कारगिलच्या बालकल्याण समिती (CEC) च्या ताब्यात आहे. तीन चार दिवसांत या मुलाला पोलिसांच्या चर्चेनंतर तिच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात येणार आहे.