मनोज सातवी, वसई
नालासोपारा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने "बनावट मार्कशीट रॅकेटचा" पर्दाफाश केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये केवळ 65,000 रुपयांमध्ये तीन महिन्यांत B.Com ची पदवी आणि तीही तीनही वर्षांच्या मागील तारखेची मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस येऊन पाच महिने उलटल्यानंतर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, प्रत्यक्ष आरोपींवर कारवाई करण्यासाठी तब्बल 9 महिने लागल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, अनेक विद्यापीठे आणि काही शिक्षण संस्था सामील असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी वालीव पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा- AI Affected Jobs: AI मुळे 'या' 40 क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका! तुमचा जॉब सुरक्षित आहे का? वाचा संपूर्ण यादी)
रावल यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी 18 जुलै रोजी आरोपी एजंट अनुपमा नयन मंडल, संगीता सुनील जैन आणि कर्मचारी श्रद्धा आरेकर यांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी दीप भल्ला आणि सूत्रधार रवी भल्ला हे कारवाईदरम्यान उपस्थित असूनही त्यांना अटक करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप सन्नी रावल यांनी केला आहे.
काही विद्यापीठांवर कारवाई
पोलिसांनी आतापर्यंत कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे B.com, LLB, BA, बीबीए शाखांचे बॅकडेटेड रिझल्ट, मार्कशीट, स्टॅम्प्स, प्रिंटर आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे.
(नक्की वाचा- Mumbai Local Ticket on Whatsapp: लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार 'व्हॉट्सअॅप'वर; कशी असेल प्रक्रिया?)
पोलिसांनी आतापर्यंत ISBN University (छत्तीसगड), मॅथ्स युनिव्हर्सिटी (रायपूर, छत्तीसगड), नीलम युनिव्हर्सिटी (कैथल, हरियाणा), मोनार्ड युनिव्हर्सिटी (हापुर, उत्तर प्रदेश), कॅलोक्स युनिव्हर्सिटी, टीचर्स युनिव्हर्सिटी (अहमदाबाद, गुजरात), कलिंगा युनिव्हर्सिटी (रायपूर, छत्तीसगड), अरनी यूनिवर्सिटी (कांगरा, हिमाचल प्रदेश), सनराईज युनिव्हर्सिटी (अलवर, राजस्थान) या विद्यापीठांवर कारवाई केली आहे
सन्नी रावल यांनी असा दावा केला आहे की, ही कारवाई केवळ एका मोठ्या हिमनगाचे टोक (Tip of the iceberg) आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी अनेक विद्यापीठे सहभागी असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासाची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.