जाहिरात

100 वर्षांची परंपरा; संस्कृती अन् शारिरीक शक्तीचं प्रदर्शन; अक्षय्य तृतीयेला होणारी 'सालगडी'ची प्रथा काय आहे?

नंदुरबार शहरात मात्र एका आगळ्यावेगळ्या परंपरेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही परंपरा १०० वर्षांहून अधिक काळापेक्षाही जुनी आहे.

100 वर्षांची परंपरा; संस्कृती अन् शारिरीक शक्तीचं प्रदर्शन; अक्षय्य तृतीयेला होणारी 'सालगडी'ची प्रथा काय आहे?

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी 

Nandurbar News : आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्साह राज्यभरात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक ठिकाणी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. याशिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्येही अक्षय्य तृतीयेला विविध प्रथा पार पडत असल्याचं दिसतं. नंदुरबार शहरात मात्र एका आगळ्यावेगळ्या परंपरेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही परंपरा १०० वर्षांहून अधिक काळापेक्षाही जुनी आहे. सध्या या परंपरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नंदुरबारमधील १०० वर्षे जुनी परंपरा काय आहे?

शेतीकामासाठी सक्षम सालदार  निवडण्यासाठी पूर्वी प्रचलित असलेली दगड उचलण्याची स्पर्धा आजही माळीवाडा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. आधुनिक काळात मजुरीच्या पद्धती बदलल्या असल्या तरी आपली संस्कृती आणि शारीरिक शक्तीचे प्रदर्शन घडवणारी ही परंपरा येथील स्थानिकांनी आजही जिवंत ठेवली आहे. पूर्वीच्या काळी शेतीकामासाठी वर्षभराच्या करारावर गडी सालदार (साल म्हणजे वर्ष आणि गडी म्हणजे माणूस, गावात वर्षभराचा करार करून शेतीची सर्नकामं करणारी व्यक्ती म्हणजे सालगडी) ठेवताना त्याची शारीरिक क्षमता तपासली जात असे.

नक्की वाचा - 'एका लहानग्याने' उडवली भारताची झोप, जगभरात उडाली खळबळ

जो तरुण सव्वा मणाचा अंदाजे ५० ते ६० किलो जड आणि गुळगुळीत गोलाकार दगड सहजपणे उचलून दाखवतो तो शेतीकामासाठी सर्वात योग्य मानला जायचा. अशा तरुणाला वर्षभरासाठी चांगला मोबदलाही मिळत असे. आज ही निवड प्रक्रिया कालबाह्य झाली असली, तरी परंपरेचा ठेवा म्हणून माळीवाड्यातील नागरिक दरवर्षी अक्षय तृतीयेला हा सोहळा आयोजित करतात. या उत्सवात वापरला जाणारा दगड हा गोलाकार आणि गुळगुळीत असल्याने तो उचलणं सोपं नसतं. तो उचलण्यासाठी केवळ ताकदच नाही, तर विशिष्ट तंत्र आणि कसब आवश्यक असते. आज झालेल्या या सोहळ्यात माळीवाडा परिसरातील अनेक युवकांनी आणि ज्येष्ठांनी सहभाग घेतला. तो जड दगड लिलया उचलणाऱ्या तरुणांचा उत्साह पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com