राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन 2025 च्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार, गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या दिवसांची सुट्टी रद्द करून त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू असतील असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजनाही शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे.
( नक्की वाचा: नारळी पौर्णिमा कधी आहे? सणाचे महत्त्व, तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या )
यापूर्वीच्या 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, गुरुवारच्या शासन शुद्धीपत्रकानुसार यात बदल करण्यात आला आहे.नवीन बदलांनुसार, आता गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी, नारळी पौर्णिमा (शुक्रवार, 08 ऑगस्ट, 2025) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (मंगळवार, 02 सप्टेंबर, 2025) या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
( नक्की वाचा: हायकोर्टाचा दणका, कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम )
हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला असून , तो राज्यपाल यांच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिलीप देशपांडे, शासनाचे उप सचिव यांनी या आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. या संदर्भातले परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 202508071434078707 असा आहे. या आदेशाची प्रत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार आणि विविध मंत्रालयीन विभाग, उच्च न्यायालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.