Narayan Rane On Thackeray : शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सरकारचा कडाडून विरोध केला. हिंदी भाषा सक्तीचे आदेश घेतल्यानंतरही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक कायम आहे. कारण येत्या 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू विजयी जल्लोषासाठी एकत्र जमणार आहे. राज आणि उद्धव यांच्या जवळीकीवरुन विरोध सातत्याने निशाणा साधत आहे. यातच माजी केंद्रीय मंत्री नारायण यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांना सल्ला देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
(नक्की वाचा- CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं)
नारायण राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहात. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राजजी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत."
"सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवले याने सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती!", अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली.
( नक्की वाचा : Bharat Gogawale: 'नारायण राणेंनी मर्डर केले' राणेंच्या मुलासमोरच भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब )
वैभव नाईकांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावरून पोस्ट करत डिवचल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते आज घडतंय, त्यामुळे भाजपच्या नारायण राणेंसारखा नेत्यांना पोटशूळ येतोय. उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांवर तुम्ही बोललात, शिवसेना संपवून टाकू असं बोलतात, शिवसेनेचा कार्यकर्ता शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलं. त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तुमचा मुलगा निवडणुकीत उभा केलात. शिवसेनेचा प्रचार केलात, त्याच बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होत. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वार्थसाठी करता. त्यामुळे तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही", अशी टीका वैभव नाईक यांनी केली.