Nashik Accident News: नाशिकच्या दिंडोरीमध्ये एक भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार विहिरीत कोसळल्याने हा अपघात झाला. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.
एका खाजगी क्लासचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात आटोपून घरी परतत असताना, काळाने या कुटुंबावर झडप घातली. त्यांची मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील विहिरीत कोसळल्याने ही घटना घडली.
गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील दरगुडे हे आपल्या कुटुंबासह एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून रात्रीच्या सुमारास सर्वजण आनंदाने घरी परतत होते. मात्र, वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या, पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली.
मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश
सुनील दरगुडे, त्यांच्या पत्नी आणि त्यांची सात वर्षांची मुलगी यांचा या अपघातात अंत झाला आहे. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक पोलिसांचे बचावकार्य सुरू होते. घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.
अपघातातील मृतांची नावे
- रेश्मा सुनील दरगुडे (वय 27)
- आशा अनिल दरगुडे (वय 32)
- खुशी अनिल दरगुडे (वय 14)
- श्रेयस अनिल दरगुड (वय 11)
- राखी सुनील दरगुडे (वय 11)
- श्रावणी अनिल दरगुडे (वय 11)
- समृद्धी राजेंद्र दरगुडे वय (वय 7)
- माधुरी अनिल दरगुडे (वय 13)
- सुनील दत्तू दरगुडे (वय 32)