जाहिरात

Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO

Nashik News:  नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीजवळील भावली धरण परिसरात एका महिलेची छेड काढल्याचा जाब विचारणे एका कुटुंबाला अत्यंत महागात पडले आहे.

Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO
Nashik News: कारमध्ये 4 लहान मुले असतानाही हे गुंड अत्यंत निर्दयीपणे हल्ले करत होते.
नाशिक:

Nashik News:  नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीजवळील भावली धरण परिसरात एका महिलेची छेड काढल्याचा जाब विचारणे एका कुटुंबाला अत्यंत महागात पडले आहे. छेडछाड करणाऱ्या 10 ते 12 गुंडांनी या कुटुंबाच्या कारचा तब्बल 20 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करत लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.  आम्ही गाडी थांबवली असती, तर त्यांनी आम्हा सर्वांना जिवानिशी मारून टाकले असते, असा थरकाप उडवणारा अनुभव पीडित महिलेने सांगितला आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक येथील एकाच कुटुंबातील 8 जण रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भावली धरण आणि धबधबा परिसरात गेले होते. या कुटुंबामध्ये 4 लहान मुलांचाही समावेश होता. सर्वांनी तिथे एकत्र जेवण केले, पाण्यात खेळले आणि ते घरच्या दिशेने निघण्याच्या तयारीत होते. नेमक्या याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन नराधमांनी महिलेला नावाने हाक मारत तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

महिलेने आणि तिच्या पतीने या प्रकाराला कडाडून विरोध केला. सार्वजनिक ठिकाणी महिलेची छेड का काढता, असा जाब त्यांनी विचारला असता ते गुंड अधिकच आक्रमक झाले. पाहता पाहता त्यांच्या मदतीला आजूबाजूच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील इतर लोक धावून आले आणि 10 ते 12 जणांच्या टोळक्याने या कुटुंबावर हल्ला चढवला.

( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
 

लोखंडी रॉडने कारचा चक्काचूर

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबाने कारमध्ये बसून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या टोळक्याने कार अडवून तिच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. हे गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुचाकीवरून या कुटुंबाच्या कारचा तब्बल 20 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. 

रस्त्यात जिथे कुठे ट्रॅफिकमुळे कारचा वेग कमी व्हायचा, तिथे हे गुंड लोखंडी रॉडने कारवर हल्ला करायचे. या भयंकर हल्ल्यात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. कारमध्ये 4 लहान मुले असतानाही हे गुंड अत्यंत निर्दयीपणे हल्ले करत होते, ज्यामुळे ही मुले आजही प्रचंड दहशतीखाली आहेत.

( नक्की वाचा : TCS धर्मांतर प्रकरणातील निदा खानला जामीन देताना कोर्टाने थेट श्रीकृष्णाचा दाखला का दिला? वाचा सविस्तर )
 

9 आरोपींना अटक

या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 9 आरोपींना अटक केली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरचौकात आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढण्याचे आणि त्यानंतर असा हिंस्त्र हल्ला करण्याचे धाडस या गुंडांमध्ये येतेच कुठून, असा संतप्त सवाल पीडित महिलेने उपस्थित केला आहे. 

या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा कोणाची अशी हिंमत होणार नाही, अशी मागणी तिने केली आहे. इतका भयंकर प्रसंग ओढवूनही, मी अन्यायासमोर झुकणार नाही आणि पुन्हा असा प्रकार घडला तर पुन्हा जाब विचारीन, असा निर्धार या धाडसी महिलेने व्यक्त केला आहे.

इथे पाहा संपूर्ण VIDEO

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com