जाहिरात

Nashik News : नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा पार्ट लवकरच? शहरातील घडामोडींना वेग, 'त्या' लग्नाची चर्चा...

नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील संभाव्य फुटीची.

Nashik News : नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा पार्ट लवकरच? शहरातील घडामोडींना वेग, 'त्या' लग्नाची चर्चा...

Nashik News : नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील संभाव्य फुटीची. नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक असून त्यापैकी 10 ते 12 नगरसेवक आणि एक प्रमुख नेता शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी शिंदे सेनेने ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांना आपल्या गोटात घेत ‘ऑपरेशन टायगर' यशस्वी केल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिका गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषद घेतली. “आमचे कोणतेही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाहीत,” असा ठाम दावा त्यांनी केला. मात्र, त्याचवेळी शिंदे सेनेने काही एजंट नेमून आमच्या नगरसेवकांना पाच कोटी रुपयांच्या विकासनिधीची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे फुटीच्या चर्चांना एका अर्थाने त्यांनी दुजोरा दिल्याचे मानले जात आहे.

नक्की वाचा - Nashik News : नाशिकपासून 30 किमी अंतरावरील शहराचं रुप पालटणार, गुंतवणूक वाढली; जमिनीचे भाव पाहून धक्काच बसेल!

पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक...

या सर्व घडामोडींनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून आले. पक्षाचे सहसंपर्क नेते रवींद्र मिर्लेकर शनिवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. शहरातील मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती मिळाली. मात्र, दिवसभर राजकीय चर्चांचा धुरळा उडत असताना संध्याकाळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मालेगावचे शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच मंचावर दिसले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे यांच्यासोबतच ठाकरे सेनेचे रवींद्र मिर्लेकर आणि माजी आमदार वसंत गीते यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. या फोटोसेशनमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असून नाशिकमध्ये पुढे कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com