Nashik News: 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणारा आणि बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा अशोक खरात उर्फ 'स्वघोषित कॅप्टन' याला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून अनेक आक्षेपार्ह पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिलेच्या तकारीनंतर सरकार वाडा पोलीस ठाण्यात ज्योतिष अशोक खरात विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
कार्यालयात 'हनीट्रॅप'चा सापळा?
तपासादरम्यान पोलिसांना खरात याच्या 'ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स' या कार्यालयाबद्दल धक्कादायक माहिती मिळाली. खरात याने आपल्या कार्यालयात छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये काही महिलांच्या व्हिडिओंचा समावेश आहे. महिलांना भुरळ पाडून, भविष्याची भीती दाखवून किंवा इतर आमिषे दाखवून तो त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Palghar News: पैशाची हाव नडली! डहाणूत सरकारी डॉक्टर लाच घेताना ACB च्या जाळ्यात)
तपासाची व्याप्ती आणि धागेदोरे
कॅप्टन खरात याचे धागेदोरे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी जोडलेले आहेत. जप्त केलेल्या व्हिडिओंमध्ये कोणाकोणाचे चेहरे आहेत, याचा तपास नाशिक क्राईम ब्रांच करत आहे. यामुळे अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, क्राईम ब्रांचने तत्परता दाखवत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Ashok Kharat
कोण आहे 'स्वघोषित' कॅप्टन अशोक खरात?
अशोक खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचे सांगतो.सुमारे 22 वर्षांच्या सेवाकाळात त्याने देशांचा प्रवास केला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी ‘कॉस्मोलॉजी' या विषयाकडे लक्ष केंद्रित केले. ही शाखा विश्वाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास करणारी असून Cosmology या विज्ञानात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्याचे सांगितले जाते. त्यांच्या गुरू स्व. मुजुमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले आणि प्रशिक्षणात सुवर्णपदकही मिळवले.
(नक्की वाचा- CCTV Footage: सोनं-चांदी, पैसे अन् सिलिंडरही चोरला! मध्य प्रदेशातील चोरीच्या घटनेची देशभर चर्चा)
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांना भविष्य सांगण्यासाठी तो प्रसिद्ध होता. शिंदेंनी आपल्या राजकीय भविष्यासाठी खरात यांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. तो 'शिवनिका ट्रस्ट'चा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहत होता.