जाहिरात

Nashik Rain: नाशिक जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा; जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?

Nashik News: त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून नाशिक शहरासह 6 तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Nashik Rain: नाशिक जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा; जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?

Nashik Rain: नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात रात्री 1 ते सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः नाशिकमध्ये दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

नाशिकमध्ये 62 मिमी पावसाची नोंद

नाशिक शहरात काल रात्री 8.30 ते आज पहाटे 5.30 पर्यंत तब्बल 62 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रात्री साडेअकरा ते अडीच या अवघ्या 3 तासांत 21 मिमी पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे गौतमी गोदावरी धरणातून 780 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे, कळवण तालुक्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्यपीठ असलेल्या प्रसिद्ध सप्तशृंग गड परिसरातही मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे गडावर जाणाऱ्या भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शाळांना सुट्टी, आठवडे बाजार बंद

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि कळवण या 6 बाधित तालुक्यांमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्व आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकरदार नागरिकांना अत्यंत आवश्यक काम नसेल तर घरातूनच काम करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ल्यातून 100 हून अधिक लोकांचे सुरक्षित स्थलांतर

त्र्यंबकेश्वर परिसरातील मेटघर किल्ला परिसरात पहाटेपासूनच तुफानी पाऊस सुरू आहे. संभाव्य धोका ओळखून रात्रीच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या दुर्गम भागाला भेट दिली आणि नागरिकांशी थेट चर्चा केली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील जवळपास 100 हून अधिक लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की, "जिथे जिथे ढगफुटी किंवा अतिवृष्टीचा अंदाज आहे, तिथे प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. तसेच शेजारील पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही बोलणे झाले असून त्यांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत."
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com