राहुल वाघ, नाशिक
नाशिक शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात लस घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच 17 वर्षांच्या श्रावणी पाटील या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून लसीकरणाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरुवातीला सोशल मीडियावर ही गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक लस असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र प्रशासनाने अधिकृत खुलासा करत या अफवा फेटाळल्या आहेत.
श्रावणीसोबत नेमकं काय घडलं?
नाशिकच्या खुटवडनगर परिसरात राहणारी श्रावणी पाटील गुरुवारी आपल्या वडिलांसोबत महानगरपालिकेच्या स्थानिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेली होती. आरोग्य केंद्रात तिला टीटी लस देण्यात आली. लस टोचून घेतल्यानंतर ती वडिलांसोबत घरी परतत होती. रस्त्यात अचानक श्रावणीला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. त्याच वेळी तिच्या नाकातून वेगाने रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिची प्रकृती झपाट्याने खालावली. वडिलांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिला मृत घोषित केले.
(नक्की वाचा: Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)
पुण्यातून विशेष तपास पथक नाशिकला रवाना
श्रावणीच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. लसीकरणानंतर उद्भवलेल्या प्रतिकूल परिणामांचा सखोल तपास करण्यासाठी पुण्यातून विशेष लसीकरण दक्षता पथक नाशिककडे रवाना झाले आहे. नाशिक महापालिकेच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
दुसरीकडे, श्रावणीच्या मृत्यूमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संतप्त कुटुंबीयांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "श्रावणी पूर्णपणे निरोगी आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, तिला कोणताही पूर्वआजार नव्हता. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतः घरी आले होते आणि त्यांनी लसीकरणासाठी विशेष आग्रह धरला होता. त्यांच्याच सांगण्यावरून ती वडिलांसोबत केंद्रात गेली होती."
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ही लस नियमित आरोग्य मोहिमेचा भाग होती. मात्र, पूर्णपणे निरोगी असलेल्या श्रावणीचा लस घेतल्यानंतर लगेचच मृत्यू का झाला? लसीमध्ये काही दोष होता की तिला काही रिॲक्शन आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुण्यातील तज्ज्ञ समितीच्या शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world