
कौशल्य विभागाच्या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमाने राज्यातील लाखो तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. आता सिडको व कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार आहे. यातून प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे नवे दरवाजे उघडले जाणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गर्शनात प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी सबंधित लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. त्याच थेट फायदा प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडको निर्माण करत असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी या परिसरात काही गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रतांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने तिथल्या इच्छुक प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रस्ताव सिडकोने कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला सादर केला होता. या प्रस्तावाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने मान्यता दिली आहे. शिवाय कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक प्रकल्पग्रस्तांना विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाने दिली आहे.
प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुक्रमे एअरलाईन बॅगेज हॅण्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाईन ग्राउंड स्टाफ अर्थात विमानतळ सेवा क्षेत्राशी संबंधित अशा पाच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 1191 प्रकल्पग्रस्तांनी यात नोंदणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या https:www.mahaswayam.gov.in महास्वयम संकेतस्थळावर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर केंद्राच्या कौशल्य विकास निकषानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
व्यावसायिक, औद्योगिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास विभागाने राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 'सामाजिक दायित्व' हा या विभागाच्या कार्याचा महत्वाचा घटक आहे. या अनुषंगाने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक नकाशावर नवी मुंबई हे शहर लवकरच आपला ठसा उमटवणार असून यात कौशल्य विकास विभागाचे ही मोठे योगदान असेल याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे लोढा म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कौशल्य विभाग सामाजिक बांधिलकीतून कार्यरत आहे. यापुढेही सिडकोच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात दिला जाईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world