
Mumbai Metro 8 Gold Line: मुंबई महानगर प्रदेशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'मेट्रो मार्गिका 8' (Metro Line 8) चा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आता अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र शासनाने (GoM) या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना थेट जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. विशेष बाब ही आहे की दोन्ही विमानतळे जोडली जाणार असल्याने खासकरून विमानाने प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. या मार्गावर एकूण 13 प्रमुख स्टेशन प्रस्तावित आहेत, ज्यामुळे प्रवाशांना झटपट आणि आरामशीर प्रवास करता येईल.
दोन्ही विमानतळांचे T2 जोडणारी मेट्रो
सिडकोने (CIDCO) सल्लागार मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लि. (UMTC) यांच्यामार्फत तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, मेट्रो 8 मार्गीका (Mumbai Metro 8 Gold Line) एकूण 34.89 किलोमीटर लांबीची असेल. हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पासून सुरू होईल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 येथे समाप्त होईल. यामध्ये 9.25 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून तर उर्वरित 25.64 किलोमीटरचा मार्ग उन्नत (Elevated) प्रस्तावित आहे.
Mumbai Metro 8 Gold Line वर कोणती स्थानके असणार ?
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल 2) - (CSMIA T2)
- फिनिक्स मॉल (एल बी एस मार्ग)
- स.गो.बर्वे मार्ग,कुर्ला
- लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
- बैंगनवाडी
- मानखुर्द
- वाशी
- जुईनगर
- नेरूळ
- सिवुड्स
- सागर संगम
- तरघर
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA T2)
Mumbai Metro 8 Gold Line चे काम कधी पूर्ण होणार ?
महाराष्ट्र शासनाने 27 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, या प्रकल्पाला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) योजनेअंतर्गत अंमलबजावणीसाठी तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. DPR नुसार, प्रकल्पाचा प्रत्यक्ष बांधकाम कालावधी 60 महिन्यांचा (5 वर्षांचा) असेल. कामाला जून 2026 मध्ये सुरुवात होणे अपेक्षित आहे आणि ते मे 2031 मध्ये पूर्ण होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. जून 2031 पासून हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world