राहुल कांबळे, प्रतिनिधी
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणे प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट शासकीय आदेश असूनही, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) यांनी स्वतःच्या कॅबिनमध्येच थाटात वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीच स्पष्ट निर्देश दिले आहेत की, “शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचे वाढदिवस साजरे करु नयेत. यामध्ये सामूहिक कार्यक्रम, केक कापणे, फोटो काढणे, व्हिडिओ शूटिंग आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी यांना मनाई आहे.” असे असतानाही कॅफो यांनीच शासकीय आदेशाचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा केला, यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय धोरण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
तालुका, जिल्हा आणि महापालिका कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापणे, स्टाफसोबत फोटो काढणे, व्हिडिओ रिल्स तयार करून त्यातून सामाजिक प्रतिमा उभारण्याचा प्रकार वाढत आहे. हा ट्रेंड केवळ छायाचित्रांपुरता न राहता कार्यालयीन वेळ आणि साधनांचा गैरवापर करत आहे.
( नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये भयंकर अत्याचार! 'तो' नराधम अखेर सापडला )
नवी मुंबई पालिका मुख्यालयातच आदेशाला हरताळ!
मनपाच्या मुख्यालयातच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेशाचे उल्लंघन होत असेल, तर इतर विभागीय कार्यालयांमध्ये सामान्य कर्मचाऱ्यांकडून असे प्रकार झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल का? आणि मुख्यालयातील कॅफोवर कारवाई करण्याची हिम्मत मनपा आयुक्त दाखवतील का? असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
नवी मुंबई पालिकेचे कॅफो म्हणजे अपवाद?
राज्य शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, हा नियम फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी आहे का, की वरिष्ठ अधिकारी अपवाद आहेत? अशा घटनांमुळे प्रशासनातील शिस्त व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.