Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या कामगिरीचा धडाका सुरुवातीपासूनच कायम ठेवला असून अवघ्या काही दिवसांतच एक मोठा टप्पा गाठला आहे. व्यावसायिक उड्डाणे सुरू झाल्यानंतर पहिल्या 19 दिवसांमध्येच 1 लाख प्रवाशांचा आकडा पार करून या विमानतळाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. प्रवाशांकडून मिळणारा हा उदंड प्रतिसाद पाहता, आगामी काळात हे विमानतळ देशातील महत्त्वाच्या हवाई केंद्रांपैकी एक ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टने (एनएमआयए) दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी 2026 पर्यंत एकूण 1,09,917 प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे.
यामध्ये 55,934 प्रवाशांनी विमानतळावर आगमन केले, तर 53,983 प्रवाशांनी येथून इतर शहरांसाठी प्रस्थान केले. विशेष म्हणजे 10 जानेवारी 2026 हा दिवस विमानतळासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक व्यस्त दिवस ठरला असून, त्या एकाच दिवशी 7,345 प्रवाशांची हाताळणी करण्यात आली.
( नक्की वाचा : Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्यास होईल धावपळ )
विमान उड्डाणे आणि सामानाची हाताळणी
केवळ प्रवासीच नव्हे तर विमानांच्या येण्या-जाण्याच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या 19 दिवसांच्या कालावधीत विमानतळाने एकूण 734 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स हाताळल्या आहेत. यामध्ये व्यावसायिक विमानांसोबतच 32 जनरल एव्हिएशन उड्डाणांचाही समावेश आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी सामान हाताळणीची यंत्रणाही सक्षमपणे काम करत असून, आतापर्यंत 40,260 आगमन बॅग्ज आणि 38,774 प्रस्थान बॅग्जची यशस्वीरीत्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
कार्गो आणि प्रमुख शहरे
प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीमध्येही या विमानतळाने आपले अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 22.21 टन कार्गोची हाताळणी येथे करण्यात आली असून प्रवासी आणि मालवाहतूक अशा दोन्ही आघाड्यांवर विमानतळ सज्ज असल्याचे हे लक्षण आहे. प्रवाशांच्या पसंतीचा विचार करता, नवी मुंबईतून दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू या शहरांसाठी सर्वाधिक विमान प्रवास झाल्याचे दिसून आले आहे.
आधुनिक सुविधांचा प्रवाशांना फायदा
सुरक्षितता, सेवेचा दर्जा आणि प्रवाशांना मिळणारा सुखद अनुभव यावर या विमानतळ प्रशासनाचा प्रामुख्याने भर आहे. आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुव्यवस्थित प्रक्रियेमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून त्यांना कोणताही त्रास न होता प्रवास करता येत आहे.
टप्प्याटप्प्याने आपल्या सेवांचा विस्तार करत असलेल्या या विमानतळाने सुरुवातीच्या काळातच कमावलेला प्रवाशांचा विश्वास मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक मानला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world