जाहिरात

Navi Mumbai News: नवी मुंबईत भाजपची अग्निपरीक्षा! बहुमत असलं तरी महापौर-उपमहापौर महायुतीचा होणार?

Navi Mumbai News: ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेतही महायुतीचा प्रयोग होणार का?

Navi Mumbai News: नवी मुंबईत भाजपची अग्निपरीक्षा! बहुमत असलं तरी महापौर-उपमहापौर महायुतीचा होणार?
"Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर कोणाचा होणार?"
Eknath Shinde And Ganesh Naik X
  • नवी मुंबईत महापौर कोणाचा होणार?
  • नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत
  • निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमुळे दुरावा आला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai News: ठाणे महानगरपालिकेतील सत्तारचनेने संपूर्ण महाराष्ट्रात एक स्पष्ट संदेश दिला आहे कि, राजकारणात बहुमत असूनही सत्तेचा अहंकार चालत नाही. 112  जागांपैकी तब्बल 78 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने (शिंदे गट) महापौरपद स्वतःकडे ठेवत, युतीधर्म म्हणून भाजपला उपमहापौरपद दिले. कल्याण डोंबिवलीमध्येही शिवसेनेने मनाचा हा मोठपणा दाखवलेला आहे. ही केवळ औपचारिक तडजोड नव्हती, तर आगामी राजकारणासाठी टाकलेले एक रणनीतीपूर्ण पाऊल होते. याच पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होतो कि, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर नवी मुंबईतही महायुतीचा प्रयोग होणार का?

नवी मुंबईतील सत्तासमीकरण | Power Equation In Navi Mumbai Municipal Corporation 

नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपने 65 जागा जिंकत सत्ता स्थापनेचा एकहाती अधिकार मिळवला आहे, तर शिवसेना (शिंदे गट) 42 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकड्यांनुसार भाजपला शिवसेनेच्या आधाराची आवश्यकता नाही. पण राजकारणाची व्यवहार्यता कधी-कधी आकडेमोडीवर चालत नसते, तर ती राजकीय अजेंड्यावर  आणि भविष्यातील सत्ता-समीकरणांच्या रचलेल्या अंदाजावर चालत असते.

निवडणुकीपूर्वीची अपयशी युती चर्चा | Pre-Poll Alliance Talks

नवी मुंबईत महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युतीची चर्चा झाली होती. पण शिवसेनेचा 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला आणि भाजपची केवळ 20 जागा सोडण्याची तयारी या दोन टोकांमुळे बोलणी फिस्कटली. परिणामी दोन्ही पक्ष आमनेसामने आले. भाजपने फुशारकी मारली, बहुमत खेचले, पण अपेक्षित 70० प्लस'चा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेनेही 42 जागा मिळवत आपले अस्तित्व ठसठशीतपणे सिद्ध केले.

स्थानिक नेत्यांमधील दुरावा | Growing Rift Between Local Leaders

नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये आज साधा विस्तवही जात नाही, हे वास्तव आहे. तसेच निवडणूक काळात झालेली वैयक्तिक टीका, आरोप-प्रत्यारोप, आणि कटु प्रचारामुळे दोन्ही पक्षांतील दुरावा अधिकच वाढला. विशेषतः वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शब्दयुद्ध हे केवळ व्यक्तिगत नव्हते, तर त्यामागे निवडणूक पश्चात युती रोखण्याची देखील स्थानिक रणनीती असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपची शिस्त विरुद्ध सत्तेचा अहंकार  

भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. निवडणुका संपल्यानंतर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये,"भांडणासाठी निवडणूक आणि सत्तेसाठी युती" असा आरोप होऊ नये, याची काळजी भाजप घेईल का? की बहुमताच्या जोरावर शिवसेनेला थेट विरोधी बाकावर बसवून राजकीय वर्चस्व दाखवेल?

(नक्की वाचा: Parth Pawar News: अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी भाजपाचा विरोध? पुण्यातील ही गोष्ट भोवली?)

ठाणे आणि नवी मुंबईतील फरक | Difference Between TMC and Navi Mumbai Municipal Corporation 

ठाण्यात शिवसेनेने दाखवलेला मोठ्या मनाचा निर्णय हा केवळ औदार्य नव्हे, तर भाजपला सोबत ठेवण्याची अपरिहार्यता होती. नवी मुंबईत मात्र परिस्थिती उलटी आहे. येथे भाजप सत्ताधारी भूमिकेत असून शिवसेना दुय्यम स्थानावर आहे. त्यामुळे जर महायुती झाली, तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर शिवसेनेचा असा फॉर्म्युला स्वाभाविक ठरेल. मात्र प्रश्न हा आहे की, शिवसेना यात कनिष्ठ भागीदार होण्यास तयार आहे का?

राज्यस्तरीय दबाव निर्णायक ठरणार का? 

राजकीय वास्तव पाहता, नवी मुंबईत महायुती होण्याची शक्यता राज्यस्तरीय दबावावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाला जर महानगरपालिका पातळीवरही "महायुती अखंड" असा संदेश द्यायचा असेल, तर स्थानिक नाराजी बाजूला सारून समन्वय लादला जाऊ शकतो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेहमीच स्थानिक अहंकार, आर्थिक हितसंबंध आणि भविष्यातील आमदारकीची स्वप्ने निर्णायक ठरतात.

विरोधी बाकावर बसवल्यास परिणाम?

जर भाजपने स्वबळारच एकहाती सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले, तर शिवसेना 'आम्हाला डावलले' असा राजकीय सूर पकडेल आणि पुढील पाच वर्षे आक्रमक विरोधी भूमिका घेईल. उलट महायुती केल्यास भाजपला स्थैर्य मिळेल, पण कार्यकर्त्यांमध्ये "बहुमत असूनही प्रत्येक खात्यात वाटेकरी करण्याची तडजोड" अशी कुजबुज सुरू होईल.

महापालिकेपेक्षा मोठे राजकारण 

म्हणूनच नवी मुंबईत सध्या सुरू असलेल्या चर्चा केवळ महापौर-उपमहापौर पदापुरत्या मर्यादित नाहीत. त्या भविष्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक राजकारणाच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक ठिकाणी महायुतीचा भगवा फडकणार असे वक्तव्य केले होते.

भूतकाळातील सत्ता-समीकरणाची आठवण

तसेच मागील अडीच तीन वर्षांपूर्वीचा राज्यातील सत्तेचा पॅटर्न पाहिल्यास  केंद्रीय नेत्यांच्या दबावाने जागा जास्त असूनही भाजपाने उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले होते. आता त्यामुळे नवी मुंबईत देखील ठाण्याची पुनरावृत्ती होणार की येथे वेगळा राजकीय पॅटर्न निर्माण करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक मात्र नक्की की नवी मुंबईतला सत्तासंघर्ष हा केवळ दोन पक्षांमधला नाही, तर सत्तेच्या अहंकार आणि युतीच्या व्यवहार्यतेमधील संघर्ष आहे.

नाईक गट विरुद्ध शिंदे? | Naik vs Shinde  

सत्तेत इतर कुणी वाटेकरी नकोत म्हणूनच नवी मुंबईत नाईक गटाकडून एकनाथ शिंदे याना लक्ष्य केले जात आहे का? असा सवाल देखील उपस्थित होतो. पुढील काही दिवसांत कोण महापौर, उपमहापौर,स्थायी समिती सभापती होईल याबाबतच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागेल, मात्र त्याचे पडसाद केवळ महानगर पालिकेपुरते मर्यादित राहणार नाहीत तर राज्यभर सर्वदूर पसरतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com