जाहिरात

Ajit Pawar Death: अविश्वसनीय आणि धक्कादायक! माझा मोठा भाऊ...!! एकनाथ शिंदेंनी वाहिली मित्राला श्रद्धांजली

Eknath Shinde Pays Tribute To Ajit Pawar: शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसेच होते.

Ajit Pawar Death: अविश्वसनीय आणि धक्कादायक! माझा मोठा भाऊ...!! एकनाथ शिंदेंनी वाहिली मित्राला श्रद्धांजली
मुंबई:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. आजचा दिवस एक काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, सगळ्यांचा मित्र असलेला एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. आमच्या महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

नक्की वाचा: अजित पवारांसोबत विमानात कोणकोण होते? नेमके काय घडले ?

अजित पवार यांचे टायमिंग अफलातून होते

शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसेच होते. त्यांच्याकडे ‘टायमिंग' साधण्याचा अप्रतिम गुण होता.   त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे. शिंदे यांनी पुढे म्हटले की, तीन पक्षाचे-युतीचे सरकार म्हणून सगळ्यांनाच शासन-प्रशासनातील संवाद-समन्वयाबाबत कुतूहल असते. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यातील संबंध या अंगानेही चर्चा होते. यात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री म्हणून अजित नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असत. स्पष्टवक्ते अजित पवार आपल्या विनोदाने आणि मार्मिक कोपरखळ्यांनी वातावरण हलकं करत. 

सातत्याने पाठबळ देणारा भाऊ 

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आमचं सरकार तीन पक्षांचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत होतो. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना  खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले.  राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले, असे शिंदे यांनी म्हटले.

नक्की वाचा: अजित पवारांच्या अपघातापूर्वी काय घडलं? धक्कादायक माहिती समोर, पायलटने मेडे कॉल केला अन्...

शिंदेंची अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला आला.  आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com