Navi Mumbai News : आई-वडिलांच्या मृत्यूचा त्यांना इतका मोठा धक्का बसला होता की त्यांनी स्वत:ला तीन वर्ष घरात कोंडून ठेवले होते. अखेर त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. नवी मुंबईत हा ऱ्हदद्रावक प्रकार घडला. अनुप कुमार नायर (वय 55) असं त्यांचं नाव आहे. नायर यांनी स्वतःला तीन वर्षांहून अधिक काळ त्यांच्या घरात कोंडून घेतले होते. बाहेरील जगाशी त्यांचा संपर्क फक्त ऑनलाइन जेवण मागवण्यापुरता मर्यादित होता. एका फोन कॉलच्या आधारे 'सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह' (SEAL) या संस्थेचे कार्यकर्ते सेक्टर 24 मधील त्यांच्या सोसायटीत पोहोचले आणि त्यांनी त्यांची परिस्थिती पाहून त्यांना तिथून बाहेर काढले.
नायर हे पूर्वी संगणक प्रोग्रामर म्हणून काम करत होते आणि या घरात एकटेच राहत होते. त्यांची आई भारतीय वायुसेनेच्या दूरसंचार विभागात कार्यरत होती, तर वडील मुंबईतील टाटा रुग्णालयात काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 6 वर्षांत त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले, आणि 20 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाने आत्महत्या केली होती. या घटनांमुळे अनूप यांनी स्वतःला बाहेरील जगापासून पूर्णपणे तोडून घेतले होते आणि ते त्यांच्या घरातच बंदिस्त राहत होते.
पायाला संसर्ग झाला होता पण...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नायर त्यांच्या दिवाणखान्यात ठेवलेल्या खुर्चीवरच झोपत असत. त्यांच्या पायाला संसर्ग झाला होता, ज्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु नायर यांनी बहुतेक लोकांपासून स्वतःला दूर ठेवले होते. नायर सध्या पनवेल येथील सील आश्रमात आहेत.
( नक्की वाचा : 'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह )
नायर ज्या इमारतीत राहत होते, तेथील रहिवाशांनी सांगितले की ते क्वचितच त्यांच्या घराचा दरवाजा उघडत असत. ते घरातील कचराही बाहेर टाकत नसत, त्यामुळे इमारतीतील सदस्यांना कधीकधी त्यांना कचरा बाहेर काढण्यासाठी समजावून सांगावे लागत असे.