Navi Mumbai : कामोठे परिसरात रात्री-अपरात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतापजनक नागरिक अखेर रस्त्यावर उतरले आहेत. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वीज समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी रात्री उशीरा महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडलं.
हजारो नागरिकांची महावितरणाच्या कार्यालयावर धडक
कामोठे शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उकाड्याच्या वातावरणात रात्री-अपरात्री वीज गायब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर आज रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास हजारो नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
वाढता जमाव आणि नागरिकांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. याचदरम्यान काही संतप्त नागरिकांनी कामोठे पोलीस ठाण्याकडेही मोर्चा वळवला. पोलीस ठाण्यासमोरील चौकात नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको केला. वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवावी, वारंवार वीज खंडीत करणं थांबवावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. उशीरापर्यंत नागरिक आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू होती.