Navi Mumbai News: नवी मुंबई परिसरात अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अशातच, रबाळे पोलीस ठाण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा शोध घेण्याची मागणी करणाऱ्या हताश कुटुंबीयांवरच पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 189(1), 189(2) आणि 190 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. या प्रकरणातील फिर्यादी हे रबाळे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युनूस इब्राहिम शेख असून आरोपींमध्ये सचिन सुभाष राठोड, राद्वीत राजू राठोड, राजू पांडू राठोड, राजू चंदू राठोड यांच्यासह अन्य चार ते सहा अनोळखी इसमांचा समावेश आहे. सर्वजण मूळचे कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्यातील असून सध्या बदलापूर येथे राहत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ का आली?
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबातील मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध घेण्याबाबत माहिती मिळत नसल्याने 21 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजता कुटुंबीय रबाळे पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांची भेट घेऊन मुलीचा शोध घेण्याची मागणी केली. मात्र यावेळी पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात गोंधळ
फिर्यादीनुसार, “आमची मुलगी शोधून द्या, अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही,” अशी भूमिका घेत संबंधितांनी पोलीस ठाण्यात आरडाओरडा केला. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या इतर तक्रारदारांच्या कामावर परिणाम झाला. काही नागरिक भीतीपोटी पोलीस ठाण्यातून निघून गेल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
(नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )
सामाजिक संघटना आणि नागरिकांमधून संताप
दरम्यान, नवी मुंबईत अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत मुलीचा शोध घेण्याची मागणी करणाऱ्या पालकांवरच गुन्हा दाखल झाल्याने अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “बेपत्ता मुलींचा तातडीने शोध घेण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज आहे,” अशी मागणीही पुढे येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.