राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबईतील शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि पैसे न दिल्याने मारहाण केल्याच्या आरोपावरून बनसोडे यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन लाख न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी
तुर्भे एमआयडीसी परिसरात भंगार व्यवसाय करणारे सर्वेन्द्रकुमार सिंह यांनी याप्रकरणी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 जुलै रोजी रमजान शेख नावाचा इसम त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आला होता. त्याने आपण पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्या सांगण्यावरून आलो असल्याचे सांगितले. "येथे व्यवसाय चालवायचा असेल, तर दोन लाख रुपये द्यावे लागतील," अशी मागणी त्याने सिंह यांच्याकडे केली.
सिंह यांनी ही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग आल्याने, अवघ्या तीन तासांनंतर शिंदेसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे स्वतः सरिता सरोदे, रमजान शेख, नरेन साकवार आणि हुसेन शेख यांच्यासह सिंह यांच्या दुकानावर धडकल्या. त्यावेळी सर्वेन्द्रकुमार सिंह दुकानात हजर नव्हते. त्यामुळे या टोळीने त्यांचा कामगार उमेश गौड याला बेदम मारहाण केली आणि दुकानातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. तसेच, "यापुढे पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकू," अशी थेट धमकी दिली.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; चिंता मात्र कायम?)
फरार साथीदारांचा शोध सुरू
या गंभीर प्रकारानंतर 15 जुलै रोजी रात्री तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत शनिवारी मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक केली. सध्या पोलीस त्यांच्या इतर फरार साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांना पाहिजे असलेल्या सरिता सरोदेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरोदेवर यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. 2018 मध्ये तिच्याकडेही शिंदेसेनेचे एक पद होते. सद्यस्थितीत पोलिसांमार्फत तडीपारीची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
जून महिन्यातही गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे) यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या जून महिन्यात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांनी तुर्भे एमआयडीसी परिसरातील अमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून कोटीवाले यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेरच हल्ला करण्यात आला होता. या हल्ला प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world